लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: टी-१ सी-१ वाघामुळे चर्चेत आलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या देव्हारी वनग्रामचे पुनर्वसन रखडले आहे. त्यातच गावाचे सर्वेक्षण होऊन सेक्शन ११ लावण्यात आले आहे. यास एक वर्षाचा कालावधी उलटला असला तरी गावाच्या पूनर्वसनासंदर्भात हालचाली झालेल्या नाही. त्यामुळे या गावात कुठलीही विकास कामेही करता येत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी ९ डिसेंबर रोजी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी केली. विशेष म्हणजे या गावातील २० लाभार्थी हे रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी पात्र असतानाही सेक्सन ११ लागू केल्याने या योजनेचा लाभ मिळण्यात लाभार्थ्यांना अडचणी येत आहेत. सोबतच गावात कुठलीही विकास कामे करता येत नाहीत. त्यामुळे एकतर गावाचे पुनर्वसन करा किंवा गावातील विकास कामे करण्यास परवानगी द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील एक निवेदनही या ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनास दिले आहे. आम्रपाली हिवाळे, साधना हिवाळे , वंदना झिने, शशिकांत हिवाळे, श्रीकृष्ण हिवाळे, प्रशांत गवई, मिलिंद हिवाळे, नितेश जाधव, नितीन पवार यांच्यासह जवळपास ३५ जणांनी ही मागणी केली.
२९८ कुटुंबाचे पुनर्वसन गरजेचेदेव्हारी गावात गेल्या वर्षी सर्वेक्षणादरम्यान २९८ कुटंब असल्याचे स्पष्ट झाले होते. या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी ५७ कोटी रुपयांची गरज आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे; पण कोरोना संसर्गामुळे तथा अन्य प्रशासकीय तांत्रिक अडचणींमुळे अनुषंगिक निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे प्रलंबित पुनर्वसन व सेक्शन ११ लागू झाल्याने विकास कामांना मज्जाव अशा दुहेरी कात्रीत येथील ग्रामस्थ अडकलेले आहेत.