- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावर अनेक चुका होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मृतकाचे नाव, अडनाव किंवा इतर माहिती चुकीची भरल्यामुळे नातेवाईक अडचणीत सापडत आहेत. मृत्यू प्रमाणपत्रावरील दुरूस्तीसाठी नातेवाईक कोविड सेंटरमध्ये गेल्यानंतर त्याठिकाणी दुरूस्ती करून दिली जात नाही. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही डेथ सर्टिफिकेटच्या यातना येथे संपत नसल्याचे चित्र आहे.कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात कहर केला होता. दुसऱ्या लाटेने अनेकांना पोरके करून सोडले आहे. दोन महिन्यांपूर्वी कोविड सेंटरमध्येही जागा शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर नातेवाईकही घाबरलेल्या अवस्थेत रुग्णाला कोविड सेंटरमध्ये भरती करत होते. रुग्णाला भरती करत असताना त्याची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. परंतु रुग्णांच्या नावात चुका झाल्याचे प्रकार आता समोर येत आहेत. रुग्णाच्या मृत्यूनंतरही त्याच्या प्रमाणपत्रावरील माहिती चुकीची झाल्याने प्रमाणपत्रावरील दुरूस्तीसाठी नातेवाईकांचा खटाटोप सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता नातेवाईक आपल्या रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेऊन कोविड सेंटरमध्ये चूक दुरूस्तीसाठी जात आहेत. परंतु कोविड सेंटरमधील अधिकारी व कर्मचारी हे काम आमचे नाही, म्हणून त्या नातेवाईकांना परत पाठवतात.
चूक कुणाची आणि हेलपाटे कुणाला?नातेवाईक तर आपल्या रुग्णाचे नाव चुकीचे सांगू शकत नाहीत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला कोविड सेंटरमध्ये भरती करताना किंवा त्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांचे नातेवाईक भांबावलेल्या परिस्थितीत असतात. अशावेळी कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी त्या रुग्णाची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. मग या प्रकारामध्ये चूक कुणाची आणि हेलपाटे कुणाला? असा प्रश्न नातेवाईकांमधून उपस्थित होत आहे.
आमच्या घरातील मोठा आधार गेला आहे. आता मला मत्यूचे प्रमाणपत्र शैक्षणिक कामासाठी आवश्यक आहे. परंतु त्यावर नावात चुका झालेल्या आहेत. त्या कोविड सेंटरमधून दुरूस्त करून मिळत नाहीत. - मृतकाचे नातेवाईक.