बुलडाणा येथे मोताळा, नांदुरा, चिखली, सिंदखेड राजासह जिल्ह्यातील अन्य ठिकाणचे गंभीर रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. या रुग्णांसोबत असलेल्यांना शहरात नातेवाईक राहत असतानाही संक्रमणाचा धोका पाहता जाता येत नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात जेथे जागा उपलब्ध होईल तेथे रुग्णासोबतचे नातेवाईक थांबत आहेत. बुलडाणा, मलकापूर, खामगाव येथे असे चित्र आहे.
जेवणाच्या डब्यासाठी ७० कि.मी. ये-जा-
रुग्णाला जेवणाचा डबा आणण्यासाठी एका रुग्णाचे नातेवाईक तर दररोज गावाकडे ये-जा करीत असून, ७० कि.मी.चा फेरा त्यांना पडत आहे. आधी रुग्णासाठी बेड मिळविण्याची धावपळ त्यांनी केली. त्यानंतर कसाबसा बेड मिळाल्यानंतर जेवणासोबतच पाण्याची समस्या त्यांच्यासमोर उभी ठाकल्याचे चित्र येथील कोविड हॉस्पिटलच्या परिसरात निदर्शनास आले.
--बुलडाणा-औरंगाबाद-मेहकरच्या फेऱ्या--
एका बाधिताला बुलडाण्यातील खासगी रुग्णालयात गुण न आल्यामुळे नातेवाइकांनी खासगी वाहन करून अैारंगाबाद गाठले. मात्र, तेथील खासगी रुग्णालयात असलेली गर्दी पाहता तेथून थेट मेहकर येथे बेड उपलब्ध झाल्यामुळे १२ एप्रिल रोजी रात्री रुग्णासह नातेवाइकांना मेहकर गाठावे लागले होते, असे रुग्णाचे नातेवाईक समाधान जाधव यांनी सांगितले.
--पाण्याची समस्या--
मलकापूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये पाण्याची समस्या असल्याने रुग्णांसाठी बाहेरून पाणी आणावे लागत असल्याचे राधा कुळकर्णी यांनी सांगितले. बुलडाणा कोविड रुग्णालयाच्या परिसरातही अशीच समस्या आहे.