लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बुलढाणा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दिव्यांग मतदार शुक्रवारी नातेवाईकांच्या मदतीने मतदान केंद्रात आल्याचे दिसून आले. नातेवाईकांसोबतच शेजारी, मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधींनी दिव्यांग उमेदवारांच्या मदतीला धावल्याचे चित्र होते.
बुलढाणा लोकसभा मतदार संघात एकुण ६९२ दिव्यांग मतदार आहेत. यामध्ये सर्वाधिक दिव्यांग मतदार २८३ मेहकर विधानसभा मतदार संघात असून सर्वांत कमी जळगाव जामोद मतदार संघात ५७ मतदार आहेत. शुक्रवारी घरून मतदान करण्याची सुविधा नाकारण्यात आलेले दिव्यांग मतदार नातेवाईकांच्या मदतीने मतदान केंद्रात आले. त्यांना मतदानासाठी उपस्थितांनी मदत केली. तर घरून मतदान करण्याची सुविधा असलेल्या मतदारांकडून पथकामध्ये नियुक्त मतदान अधिकारी, पोलिस आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतपत्रिकेद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पाडल्या गेली.
असे आहेत विधानसभा निहाय दिव्यांग मतदार
बुलढाणा ८४चिखली ९६
सिंदखेड राजा ८९मेहकर २८३
खामगाव ८३जळगाव जामोद ५७
एकुण ६९२.....
अनेकांना नाकारली घरून मतदानाची परवानगी!
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षांवरील वयोवृध्द ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग मतदारांना घरून मतदान करण्यासाठी सुविधा देण्यात आली होती. यासाठी निवडणूक विभागाने जिल्ह्यात १०१ पथके कार्यान्वित केली होती. या पथकाकडून दिव्यांगांकडून घरून मतदानासाठी अर्जही भरून घेतले होते. मात्र, ऐनवेळी काही जणांना अशी परवानगी नाकारली गेली. त्यामुळे काही ठिकाणी ६० टक्क्यांपेक्षा अधिक िदव्यांग असलेल्यांनाही मतदान केंद्रात यावे लागल्याचे दिसून आले.