चिखली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने अंशत: लॉकडाऊन लागू केले आहेत. यामध्ये लग्न किंवा इतर समारंभासाठी अतिशय कमी जणांची परवानगी देण्यात आली आहे. याचा थेट परिणाम मंडप डेकोरेशन, लॉन, मंगल कार्यालय, कॅटरर्स व या व्यवसायाशी निगडित असलेल्यांवर होत आहे. या सर्वांचा विचार करता समारंभासाठी प्रशासनाने यापूर्वी ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक लोकांची परवानगी वाढवून द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
गेले संपूर्ण वर्ष कोरोनामुळे लॉकडाऊनमध्येच गेले त्यामुळे मंडप डेकोरेशन, बिछायत केंद्र, लॉन, मंगल कार्यालये, कॅटरर्स यांचा संपूर्ण व्यवसाय बुडाला. यावर्षी कसाबसा व्यवसाय सुरू होत असताना पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आणि प्रशासनाने निर्बंध लादले. त्यामुळे हतबल झालेल्या या व्यावसायिकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली कैफियत मांडली. सुमारे दोनशेहून अधिक जणांनी तुपकर यांना आपली समस्या सोडविण्याची मागणी केली असता त्यांना सोबत घेऊन त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासह त्यांच्याशी या समस्येबाबत चर्चा केली. मंडप डेकोरेशन, बिछायत केंद्र, लॉन, मंगल कार्यालये, कॅटरर्स यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असून आर्थिक फटका बसला आहे. शिवाय या व्यवसायाशी निगडित इतर व्यवसाय आणि मजुरांची उपासमार होत आहे. व्यावसायिक कोरोना संदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यास तयार आहे. या सर्वांचे कुटुंब केवळ याच व्यवसायावर अवलंबून असल्याने प्रशासनाने लग्न सोहळा व इतर कार्यक्रमांसाठी ठरवून दिलेली नागरिकांची संख्या वाढवून द्यावी, अशी मागणी यावेळी तुपकर यांनी केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन व्यावसायिकांना दिलासा देऊ, अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी दिली.