खामगाव: आपण तरूण इतरांना तारणे हेच खऱ्या संतांचे लक्षण आहे. भय्यूजी महाराजांनी वंचितांच्या सेवेसाठी आपले जीवन खर्ची घातले. सजनपुरी येथे सेवेचे तीर्थक्षेत्र निर्माण केले. या तीर्थक्षेत्रात अनेकजण स्नान करून पवित्र होताहेत. ‘सेवा’ कर्तव्य नसून अनिवार्य कार्य आहे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.
खामगाव तालुक्यातील सजनपुरी येथे शुक्रवारी श्री सदगुरू दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्ट इंदौरच्यावतीने शैक्षणिक संकुलातील वसतीगृहाच्या उद्घाटन प्रंसगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अमनोरा एस्स फांऊडेशनचे अध्यक्ष अनिरूध्द देशमुख, विदर्भ प्रातांचे सह संघचालक चंद्रशेखर राठी, भय्यूजी महाराजांच्या धर्मपत्नी डॉ. आयुषी देशमुख, प्रशांत देशमुख, माधुरी देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, धर्म हा उन्नत करणारा असून, धर्माचे काम जोडण्याचे आहे. सेवेच्या माध्यमातून सेवा करणारा पवित्र होतो. खरी सेवा ही अंहकारमुक्त सेवा असून, सजनपुरी येथील सूर्योदय पारधी आश्रम शाळेत पवित्र सेवाकार्य सुरू आहे. वंचिताच्या या सेवाकार्यासाठी समाजाने संवेदनशील होवून पुढे आलं पाहीजे. या सेवाकार्यात जमत नसेल तर, जसे जमेल तशी सेवा केली पाहीजे. भय्यूजींच्या प्रेरणा आणि आशिवार्दाने सुरू असलेल्या या कार्याच्या दर्शनासाठी आपण येथे आलो असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी खामगाव मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर, जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे, मलकापूर मतदार संघाचे आ. चैनसुख संचेती, खामगावच्या नगराध्यक्षा अनिता डवरे, भाजप जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, माजी आमदार विजयराज शिंदे, सागर फुंडकर, ह.भ.प लक्ष्मीनारायण दायमा महाराज, प.पू. दिडेमामा, प्रकाश देशमुख, सतीश राठी, विजय देशपांडे, महादेवराव भोजने आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक अनिरूध्द देशपांडे यांनी केले. यावेळी माधुरी देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी सरसंघचालकांच्या हस्ते संदीप बावडेकर, योगेश साधवानी, अभिजीत कुंटे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन विवेक कुलकर्णी यांनी केले. आभार मुख्याध्यापक सोमनाथ गोरे यांनी मानले.