कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. कमीअधिक ११३० रुपये किंमत असलेल्या या औषधीची अलीकडे प्रचंड मागणी असल्याने बाजारात याची चढ्या भावाने विक्री होत आहे. काळाबाजारदेखील होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे मध्यंतरी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी औषधी विक्रेत्यांच्या बैठका घेऊन त्यांना कमी मार्जिन (नफा) घेऊन या औषधीची विक्री करण्याची सूचना केली होती. मात्र तक्रारी कायम असल्याने अखेर जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी मेडिकलमधून होणाऱ्या विक्रीस मनाई केली आहे. त्याऐवजी थेट कंपन्या वा स्टॉकिस्ट कोविड रुग्णालयांना रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यात येणार आहे.
नोडल अधिकारी नियुक्त
रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावर देखरेख व सनियंत्रणासाठी दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून बुलडाणा एसडीओ राजेश्वर हांडे व अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अशोक बर्डे यांचा समावेश आहे. या पुरवठ्यावर देखरेख व तुटवडा होणार नाही याची दक्षता घेण्याची जवाबदारी या नोडल अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
काय आहे रेमडेसिवीर
अलीकडे चर्चेत आलेले हे औषध नेमके काय आहे याबद्दल आता सर्वसामान्यांमध्येही उत्सुकता आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांना विचारणा केली असता त्यांनी कोविड-१९ च्या गंभीर अर्थात ९ पेक्षा जास्त स्कोअर्स असणारे, शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर हे इंजेक्शन वापरण्यात येते. अनेक डॉक्टर्स कोरोना रुग्णांवरील उपचारात हे औषध प्रभावशाली असल्याचे मानतात, असे त्यांनी स्पष्ट केले.