आतापर्यंत ६७ हजारांवर रुग्णांची कोरोनावर मात
बुलडाणा : जिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार ८१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६७ हजार २२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून बरे झालेल्या या रुग्णांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.
वातावरणातील उकाडा वाढला
धाड : तापमापीचा पारा ३५ अंशावर पोहोचला आहे. दिवसेंदिवस सूर्य तापायला लागला आहे. वातावरणातील उकाडा वाढल्याने नागरिकांना असह्य होत आहे. त्यातच दिवसा बऱ्याचदा विजेचा लपंडाव सुरू असतो. त्यामुळे घरात थांबणे अशक्य होते.
'कोरोना' संकटासोबतच पाणीटंचाईशी दोन हात!
किनगाव राजा : कोरोना विषाणूच्या संकटासोबतच परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईशी दोन हात करावे लागत आहेत. नागरिकांना उन्हा-तान्हात मिळेल तिथून पाणी आणावे लागत आहे. तेथील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
क्वारंटाईन नागरिकांची आरोग्य तपासणी गरजेची
हिवरा आश्रम : कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. काही गावांमध्ये जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायतीकडून क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. क्वारंटाईन असलेल्या नागरिकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
बेबी केअर कीटची प्रतीक्षा
बुलडाणा: अंगणवाडी केंद्रामध्ये एकात्मिक बालविकास प्रकल्पाकडून प्रथम प्रसूत मातेला बेबी केअर कीट वाटप करण्यात येते. महाराष्ट्र शासनाकडून एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने अनेकांना बेबी केअर कीटची प्रतीक्षा आहे.
शेती मशागतीला वेग
धामणगाव बढे : परिसरात शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीची कामे आटोपत आहेत. ट्रॅक्टरद्वारे वखरणी, नांगरणी केली जात आहे. खरीप हंगामाची जोमाने तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तिसऱ्यांदा जंतुनाशकाची फवारणी
मेहकर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून काही गावात तिसऱ्यांदा जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या उद्देशाने ही फवारणी करण्यात आली आहे.
कोरोनातून बरे झालेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन
देऊळगाव मही : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनमुळेही अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
भाजीपाल्यासाठी उडाली झुंबड
डोणगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० मेपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, १० मे रोजी सकाळी येथील आठवडी बाजार परिसरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती.
गृहविलगीकरणात राहणाऱ्यांचे प्रमाण वाढले
बुलडाणा : कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण खबरदारी म्हणून स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतात. सौम्य लक्षणे असलेले रुग्णही आता गृहविलगीकरण कक्षात राहत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांनी घरी राहूनही डॉक्टरांच्या संपर्कात राहावे व आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.