देऊळगाव राजा : पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या रेणुका गणेश बुरकुल यांची अविरोध निवड झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सारिका भगत यांच्या उपस्थितीमध्ये निवड प्रक्रिया मंगळवारी पंचायत समिती मध्ये पार पडली. यावेळी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण मागास प्रवर्गासाठी असल्याने याबाबत सर्व सदस्यांना सूचित करण्यात आले होते. त्याअनुषंगाने सकाळी सभापती निवास कक्षात राष्ट्रवादी पक्षाची बैठक झाली. जिल्हा परिषदेचे सदस्य तथा पक्ष निरीक्षक राम जाधव यांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या आदेशानुसार सभापती पदासाठी रेणुका बुरकुल यांचे नाव जाहीर केले. यावेळी हरीश शेटे, रेणुका बुरकुल, रजनी चित्ते, कल्याणी शिंगणे, लता सानप, भगवान खंदारे हे सहा सदस्य हजर होते. नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या निर्धारित वेळेत सभापती पदाकरिता रेणुका गणेश बुरकुल यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची अविरोध निवड निश्चित झाली होती. पंचायत समितीच्या सभागृहात दुपारी २ वाजता सभेचे कामकाज सुरू करण्यात आले. यावेळी प्रभारी सभापती हरीश शेटे, कल्याणी शिंगणे, रेणुका बुरकुल हे सदस्य हजर होते. नामनिर्देशन पत्राची छाननी झाल्यानंतर सदर अर्ज वैध ठरवण्यात आला. महाराष्ट्र जि. प., पंचायत समिती अधिनियमानुसार सभापती पदाकरिता केवळ एकच अर्ज आल्याने या पदाकरिता रेणुका गणेश बुरकुल यांचे नाव बिनविरोध घोषित करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी खूप महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. आगामी काळामध्ये सर्वसामान्य जनतेच्या समस्या मार्गी लाऊन पंचायत समितीचा कारभार हा जनहितासाठी व जनतेच्या भल्यासाठी करून ग्रामीण भागातील जनतेला न्याय देण्याचे काम सभापतीपदाच्या माध्यमातून करणार असल्याचे नवनिर्वाचित सभापती रेणुका बुरकुल यांनी सांगितले. यावेळी जि. प. सभापती रियाजखान पठाण, माजी जि. प. उपाध्यक्ष गंगाधर जाधव, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रा. दिलीपकुमार झोटे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, एल. एम. शिंगणे, तालुका अध्यक्ष राजू सिरसाट, शहर अध्यक्ष बद्री बैरागी, बाजार समिती सभापती महेश देशमुख, माजी सभापती रंगनाथ कोल्हे, गजानन पवार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
देऊळगाव राजा पं. स. सभापतीपदी राष्ट्रवादीच्या रेणुका बुरकुल अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 1:48 PM