सिंदखेडराजा :
तालुक्यातील आडगावराजा येथील गावठाण मधील ५० वर्ष जुने विद्युत खांब वाकलेले असुन विद्युत तारही जिर्ण झाले आहेत. वारंवार तार तुटतात. तार तुटत असल्याने गावात जिवीत हानी होण्याची शक्यता असुन दोन दिवसात तार व पोल दुरुस्त करा अन्यथा ग्रामस्थासह विद्युत वितरण कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा आडगावराजा येथील सरपंच कासाबाई मानसिंग कहाळे यांनी उपअभियंता विद्युत वितरण सिंदखेडराजा यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
आडगावराजा येथे अंदाजे ५० वर्षापुर्वी विद्युत खांब व पथदिव्यांसाठी विद्युत तार टाकण्यात आले आहेत. हे विद्युत खांब ठिकठिकाणी वाकलेले असल्यामुळे तारा झुकल्या आहेत. विद्युत तार जिर्ण झाले असल्यामुळे वारंवार तार तुटतात. यामुळे अचानक पडलेल्या तारांमुळे गावात जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही .याबाबतीत विद्युत वितरण कार्यालयात लेखी व तोंडी निवेदन देण्यात आले. परंतु कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही . राेहीत्रावर ए.बी.स्वीच नसल्याने परमीट घेऊन गावठाण बंद करावे लागते. गावात तार तुटली तर परमीट घेतल्या शिवाय बंद करता येत नाही. त्यामुळे गावामधे विजेच्या धक्का लागुन जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर विद्युत तार व वाकलेले पोल दोन दिवसांत सरळ करा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा आडगावराजाच्या सरपंच कासाबाई मानसिंग कहाळे यांनी उपअभियंता विद्युत वितरण व गटविकास अधिकारी पंचायत समिती सिंदखेडराजा यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.