डोणगांव : लोणीगवळी सर्कलमधील रस्त्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विदर्भ अध्यक्ष सखाराम काळदाते यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
लोणीगवळी सर्कलमधील सर्वच रस्त्त्याची अत्यंत दयनीय दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. कारण निष्कृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे सातत्याने लोणीगवळी ते डोणंगाव, लोणीगवळी ते जानेफळ, लोणीगवळी ते शहापूर मार्ग मेहकर, लोणीगवळी ते भोसा, मेहकर ते घाटबोरी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नेहमी खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून डागडुजी झालेली नाही. बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने आर्थिक भुर्दंड आणि वेळेचा अपव्यय होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी हाेत आहे.
कोरोनाच्या संकटामध्ये गेल्या एक वर्षापासून निधीअभावी रस्त्त्याची दुरुस्ती झाली नाही. आता संबंधित ठेकेदार यांच्याकडे रस्त्त्याची दुरस्ती करण्यासाठी पाठपुरावा करून,लवकरच रस्त्त्यावरचे खड्डे बुजवून दुरुस्ती करण्यात येईल. शरद मस्के, उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग मेहकर.