बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २० नाेव्हेंबर राेजी एल्गार माेर्चा काढून २९ नाेव्हेंबर राेजी शेतकऱ्यांसह मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला हाेता. त्यामुळे पाेलिसांनी तुपकर यांना २४ नाेव्हेंबर राेजी नाेटीस बजावली हाेती. तरीही ते आंदाेलनावर ठाम असल्याने बुलढाणा शहर पाेलिसांनी त्यांना २५ नाेव्हेंबर राेजी ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेची माहिती मिळताच डाेणगाव येथे दाेन व देऊळगाव मही येथे एक कार्यकर्ता माेबाइल टाॅवरवर चढला आहे. त्यांना खाली उतरवण्यासाठी पाेलिसांची कसरत सुरू आहे.
रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २० नाेव्हेंबर राेजी एल्गार माेर्चा काढून मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला हाेता. बुलढाणा पाेलिसांनी तुपकर यांना नाेटीस बजावली हाेती. तरीही ते आंदाेलन करण्यावर ठाम हाेते. त्यामुळे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेण्याची शक्यता असल्याने पाेलिसांनी रविकांत तुपकर यांना २५ नाेव्हेंबर राेजी दुपारी ताब्यात घेतले. त्यांना अटक केल्याची माहिती मिळताच जिल्हाभरात कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
मनधरणी करताना पाेलिसांची दमछाकडोणगांव येथील वैभव आखाडे व देवेंद्र आखाडे यांनी बीएसएनएलच्या टाॅवरवर चढून आंदाेलन सुरू केले आहे. तसेच सुटका हाेईपर्यंत खाली उतरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळावर ठाणेदार अमरनाथ नागरे तसेच पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांनी धाव घेऊन आंदाेलनकर्त्यांची मनधरणी सुरू केली. मात्र, जाेपर्यंत तुपकर यांची सुटका हाेणार नाही ताेपर्यंत आंदाेलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. देऊळगाव मही येथे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश श्रीराम शिंगणे हे टाॅवरवर चढले हाेते.