- नीलेश जोशीबुलडाणा: मोताळा तालुक्यातील जयपूर येथील गोविंदा गवई (६५) यांच्या कथितस्तरावरील भूकबळी प्रकरणात राज्याच्या पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांना जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी एक अहवाल पाठविला आहे. दरम्यान, या मध्ये चार अधिकाऱ्यांवर कारवाई प्रस्तावीत करण्यात आली असून संबंधितांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.प्रधान सचिवांकडून या प्रकरणी जिल्हा प्रशासनास उलट टपाली कुठलाही पत्रव्यवहार अथवा सुचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र प्रकरणात मोताळा तहसिल कार्यालयातील काही कर्मचारी व अधिकार्यांची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत असून निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, अव्वल कारकून (पुरवठा), कार्ड लिपीक अशा चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सोबतच कारणे दाखवा नोटीसचे उत्तर देण्यासाठी त्यांना मर्यादीत कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधितांची चौकशीही सुरू असून कारणे दाखवा नोटीसला मिळालेल्या उत्तरानंतर या प्रकरणात नेमके दोषी कोण हे ठरविण्यात येऊन पुढील कारवाई प्रस्तावीत करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले.जयपूर येथील गोविंदा गवई (६५) या वृद्धाचा २१ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. २२ सप्टेंबर रोजी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. प्रकरणी धान्य न मिळाल्यामुळे पतीचा मृत्यू झाल्याची तक्रार मृत व्यक्तीच्या पत्नीने तहसिल कार्यालयाकडे २८ सप्टेंबर रोजी केली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले होते. मलकापूरचे उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांनीही या प्रकरणात २८ आॅक्टोबर रोजी मोताळा तहसिल कार्यालय गाठून प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेत २९ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष जयपूर येथील मृत व्यक्तीच्या घरी भेट देऊन पाहणी केली होती तर परिसरातील नागरिकांशीही या प्रकरणात चर्चा केली होती. त्यानंतर २९ सप्टेंबरला सायंकाळी ७ ते आठ वाजे दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी संपूर्ण प्रकरणाची सविस्तर आणि वास्तव माहिती पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली होती. प्रकरणात रेशन दुकानदाराचा परवाना आधीच निलंबीत करण्यात आला आहे. मात्र प्रथम दर्शनी हा मृत्यू भूकबळी असल्याचा जिल्हा प्रशासनाने नाकारले आहे.
भूकबळी प्रकरणात प्रधान सचिवांना अहवाल सादर; चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 6:25 PM