- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : गतवर्षीसारखी पिकांवर किडीची समस्या उद्भवू नये, यासाठी कृषी विभागाने खरीप हंगामाच्या १५ दिवसांपूर्वीच विविध बियाण्यांचे १७५ नमुने घेतले होते. त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी बियाण्यांचे हे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले; मात्र आतापर्यंत केवळ ३८ नमुन्यांचाच तपासणी अहवाल प्राप्त झाला असून १३७ नमुन्यांचा तपासणी अहवाल मिळाला नाही. पेरणीला वेग आलेला असतानाही बियाण्यांच्या नमुन्याचा अहवाल गुलदस्त्यातच आहे.गेल्यावर्षी कपाशीसह इतर पिकांवर मोठ्या प्रमाणात कीडीचा प्रादुर्भाव झाला होता. बोंडअळीचा जिल्ह्यातील १ लाख ९० हजार हेक्टरवर फटका बसला होता. यासाठी काहीप्रमाणात बियाणे व हलक्या दर्जाची कीटकनाशके कारणीभूत होती. यावर्षी ही समस्या उद्भवू नये, यासाठी बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खतांची गुणवत्ता तपासणी करणे आवश्यक असल्याने कृषी विभागाने उन्हाळ्यातच जिल्ह्यात कृषी केंद्राची तपासणी मोहीम हाती घेतली होती. बियाणे, खत, किंवा कीटकनाशकांच्या बाबतीत फसवणूक झाल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊन शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन विस्कळीत होते. त्यामुळे बियाणे कंपन्या आणि कृषी केंद्र चालकांकडून शेतकºयांची फसवणूक होऊ नये, म्हणून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम कृषी विभागाला करावे लागते. त्यामुळे यावर्षी खरीपाच्या सुरूवातीला २६८ कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली होती. त्यासाठी कृषी साहित्यांची विक्री करताना स्टॉक रजिस्टर, विक्री बुक, दरपत्रक ठेवण्यापासून अनेक प्रकारच्या नियमावलींची अंमलबजावणीची पाहणी केली. यासोबतच कृषी विभागाकडून खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, तूर व इतर बियाण्यांचे नमुने घेतले होते. जिल्ह्यातून बियाण्यांचे १७५ नमुने घेतल्यानंतर ते नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. मात्र आतापर्यंत केवळ ३८ नमुन्यांचाच तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. सध्या खरीपाच्या पेरणीला वेग आला असून बियाणे नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त होत नसल्याचे दिसून येत आहे.
बियाणे नमुन्यांचा अहवाल गुलदस्त्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 5:15 PM
जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी बियाण्यांचे हे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले; मात्र आतापर्यंत केवळ ३८ नमुन्यांचाच तपासणी अहवाल प्राप्त झाला असून १३७ नमुन्यांचा तपासणी अहवाल मिळाला नाही.
ठळक मुद्देकृषी विभागाने खरीप हंगामाच्या १५ दिवसांपूर्वीच विविध बियाण्यांचे १७५ नमुने घेतले होते.आतापर्यंत केवळ ३८ नमुन्यांचाच तपासणी अहवाल प्राप्त झाला असून १३७ नमुन्यांचा तपासणी अहवाल मिळाला नाही. पेरणीला वेग आलेला असतानाही बियाण्यांच्या नमुन्याचा अहवाल गुलदस्त्यातच आहे.