हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार्या ‘मातृवंदन’ योजनेच्या लाभासाठी गर्भवती महिलांची १५0 दिवसांच्या आत नोंदणी करणे अनिवार्य राहणार आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यामध्ये ३४८ आरोग्य केंद्रांतर्गत या योजनेस नववर्षापासून प्रारंभ होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात मानवविकास कार्यक्रमांतर्गत सात तालुक्यात गर्भवती महिलांसाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. जननी सुरक्षा योजनाही जिल्ह्यात सुरू आहे. या योजनेंतर्गत लाभ घेणार्या गर्भवतींनाही ‘मातृवंदन’ योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात अजूनही माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण अपेक्षेच्या तुलनेत कमी झालेले नाही. विशेषत: ग्रामीण भागामध्ये वर्षाकाठी १00 पेक्षा अधिक बालमृत्यू होतात. या पृष्ठभूमीवर मातृवंदन योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे; मात्र या योजनेच्या लाभासाठी गर्भवती महिलेस १५0 दिवसांच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेची अंमलबजावणी १ जानेवारी २0१८ पासून होणार असून, त्याचा लाभ बुलडाणा जिल्ह्यातील ३४८ आरोग्य केंद्रांतर्गत देण्यात येणार आहे.गर्भवती महिलांना मदत करण्याकरिता १ जानेवारी २0१८ पासून मातृवंदन योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत महिलांना तीन टप्प्यात पाच हजार रुपयांचे अनुदान केंद्र शासनातर्फे देण्यात येईल. योजनेचा लाभ नोकरदार महिला सोडून सर्व गटातील महिलांना मिळेल; मात्र याव्यतिरिक्त जननी सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थींना पूर्वीप्रमाणेच अनुदान देण्यात येईल. रक्कम लाभार्थींच्या बँक खाते, पोस्ट खात्यावर जमा होईल. आरोग्य केंद्राचे लसीकरण कार्ड असणे आवश्यक आहे.
३४८ आरोग्य केंद्रांतर्गत अंमलबजावणीगर्भवती महिलेस मातृवंदन योजनेचा लाभ बुलडाणा जिल्ह्यातील ३४८ आरोग्य केंद्रांतर्गत मिळणार आहे. यासाठी सदर महिलेने आपल्या परिसरातील आरोग्य केंद्रावर आरोग्यसेविका, आशा तसेच अंगणवाडी सेविका त्यांच्या मदतीने गर्भवती झाल्यापासून १५0 दिवसांच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यात येणार्या आरोग्य केंद्रामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र २८0 आरोग्य उपकेंद्र, १२ ग्रामीण रुग्णालये, तीन उपजिल्हा रुग्णालय तसेच एक जिल्हा सामान्य रुग्णालय असे ३४८ आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.
तीन टप्प्यात लाभगर्भवती महिलेस मातृवंदन योजनेचा लाभ तीन टप्प्यात मिळणार आहे. नोंदणी झाल्यानंतर सदर महिलेस पहिल्या टप्प्यातील एक हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यानंतर सहा महिने पूर्ण झाल्यावर दुसर्या टप्प्यातील दोन हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यावेळी गर्भवती महिलेची तपासणी करण्यात येईल, तर प्रसूतीनंतर बालकाची जन्म नोंद केल्यानंतर लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तिसर्या टप्प्यातील दोन हजार रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.