जानेफळ (बुलडाणा): मेहकर तालुक्यातील मोेहना खुर्द शिवारातील एका विहिरीत शनिवारी रात्री पडलेल्या बिबट्यास वनविभागाची चमू व गावकऱ्यांनी रविवारी सकाळी ‘रेस्क्यू आॅपरेशन’ राबवून सुखरुप बाहेर काढले. बाहेर काढलेल्या बिबट्यास जंगलात सोडण्यात आले आहे.मोहना खुर्द येथील शंकरराव लाटे यांच्या शेतातील विहिरीत शनिवारी रात्री दोन वर्षाचा बिबट पडला होता. गावातीलच तुषार ताकतोडे हा तरुण विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला असता, त्याला विहिरीत बिबट्या पडलेला दिसून आला. सदर बिबट हा विहिरीत लोखंडी कडीला पाय अडकलेल्या स्थितीत होता. तुषारने ही माहिती गावात येऊन सांगितल्यानंतर शंकरराव लाटे यांनी वनपाल एस. वाय.बोबडे यांना याबाबत कळविले. तोपर्यंत बिबट्या विहिरीत पडलेला असल्याची माहिती पसरताच बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. बुलडाण्याचे उपवन संरक्षक माळी, मेहकर येथील सहाय्यक वनसंरक्षक संदीप गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी पी.आर.तोंडीलायता, वनपाल एस. वाय. बोबडे, वनरक्षक के.बी. धनगर यांच्या चमुने घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने ‘रेस्क्यू आॅपरेशन’राबवून बिबट्यास विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. विहिरीतुन बाहेर काढताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली.
Rescue Operation : विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 3:08 PM