बुलडाणा : सन २०२० ते २०२५ दरम्यान गठित हाेणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण २७ जानेवारी राेजी तहसील स्तरावर काढण्यात आले. काही दिवसांपूर्वी काढलेले आरक्षणच कायम असल्याने अनेक गावातील इच्छुकांचा हिरमाेड झाला आहे. तसेच आता २९ जानेवारी राेजी जिल्हाधिकारी कार्यालयात निघणाऱ्या महिला आरक्षणाकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी नुकतीच निवडणुक प्रक्रिया पार पडली आहे. या ग्रामपंचातींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले हाेते. तांत्रिक कारणांनी ते आरक्षण रद्द करण्यात आले. भाजप-सेना सरकारने थेट जनतेतून सरपंचाची निवड रद्द केली आहे. त्यामुळे, पुन्हा ग्रामपंचायत सदस्यांना महत्त्व आल्याने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांसह ज्येष्ठांमध्ये उत्साह हाेता. माेठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले हाेते. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, काही गावांमध्ये पॅनलला बहुमत मिळाले आहे, तर काहींना अपक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे. पॅनल आलेल्या सदस्यांना सरपंचपदाचे डाेहाळे लागले हाेते. त्यासाठी अनेकांनी तयारीही सुरू केली हाेती. विजयी झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचे लक्ष तालुकास्तरावर काढण्यात येणाऱ्या सरपंच आरक्षण साेडतीकडे लागले हाेते. अनेक सदस्यांना आरक्षणात बदल हाेण्याची अपेक्षा हाेती. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये आरक्षण कायम राहील्याने सदस्यांचा हिरमाेड झाला आहे. काही गावांमध्ये पॅनल येऊनही सरपंचपदासाठी आरक्षण असलेला सदस्य नसल्याने सत्ता गमावण्याची वेळ आली आहे. आता ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचे लक्ष आता जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात येणाऱ्या महिला आरक्षणाकडे लागले आहे.
माेठ्या ग्रामपंचायतींकडे लक्ष
बुलडाणा तालुक्यातील धाड, देउळघाट, डाेंगरखंडाळा आणि मासरुळ ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. तसेच सागवन नामाप्रसाठी राखीव झाले आहे. मेहकर तालुक्यातील डाेणगाव , देऊळगाव साकर्षा, नागापूर आदी नामाप्रसाठी तर हिवरा खुर्द अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. लाेणार तालुक्यातील सुलतानपूर, बिबी, काेयाळी,चाेरपांग्रा आदी सर्वसाधारणसाठी निघाले आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड नामाप्र, साखरखेर्डा आणि किनगाव राजा सर्वसाधारणसाठी राखीव झाले आहे. माेताळा तालुक्यातील धामणगाव बढे सर्वसाधारण, राेहीणखेड नामाप्रसाठी राखीव झाले आहे. चिखली तालुक्यातील अमडापूर अ.जा.साठी राखीव झाले आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही सर्वसाधारणासाठी राखीव झाले आहे.