अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पालिकेतील सत्ताधा-यांमध्ये सुरू असलेली धुसफूस अखेर सोमवारी चव्हाट्यावर आली. बांधकाम सभापतींच्या नाराजीनाम्यावर मुंबईत कोणताही निर्णय झाला नसल्याने सभापतींची मनधरणी करून पक्षश्रेष्ठींनी त्यांना परत पाठविले. त्यामुळे पालिकेतील राजकीय घडामोडीवर आता गुरुवारी खामगावातच फैसला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा बरोबर नसल्याची तक्रार आपणाकडे (बांधकाम सभापतींकडे) नागरिक करीत आहे. नागरिकांच्या या तक्रारींचे समाधान करू शकत नाही. सोबतच निकृष्ट दर्जाच्या कामांचे खापर आपणावर फुटू नये, यासाठी आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद करीत बांधकाम सभापती शोभा रोहणकार यांनी सोमवारी नगराध्यक्ष अनिता डवरे यांच्याकडे राजीनामा सादर केला. सभापतींनी राजीनामा देताच, पालिकेत सत्ताधाºयांमध्ये सुरू असलेली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. सभापतींपाठोपाठ स्वीकृत नगरसेवक संदीप वर्मा यांनीही राजीनाम्याचा अल्टिमेटम दिला. वर्मा यांनी प्रत्यक्षात राजीनामा दिला नसला, तरी बांधकाम सभापतींच्या नाराजीनामा नाट्यांमुळे सत्ताधाºयांच्या अंतर्गत कलहाची लक्तरे वेशीवर टांगली जात असतानाच, भाजपनेते ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी बांधकाम सभापतींना तत्काळ मुंबईत बोलावून घेतले. आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत बांधकाम सभापतींचे पुत्र महेंद्र रोहणकार यांचे म्हणणे ऐकून घेतले; मात्र यासंदर्भात कोणताही निर्णय देण्यापूर्वी आपण गुरुवारी खामगावात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सभापतींच्या राजीनाम्याच्या निर्णयावर गुरुवारपर्यंत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे; परंतु या प्रकारामुळे सत्ताधाºयांच्या अंतर्गत कलहाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेलीत, एवढे मात्र निश्चित!
ना. फुंडकरांशी रोहणकार यांची चर्चा!शोभा रोहणकार यांचे पुत्र तथा भाजप पदाधिकारी महेंद्र रोहणकार यांनी मंगळवारी पहाटेच मुंबई गाठली. दुपारी ना. भाऊसाहेब फुंडकर आणि आ. आकाश फुंडकर यांच्याशी त्यांनी यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली; मात्र त्यांच्यात कोणती चर्चा झाली, हे कळू शकले नाही.
राजीनामा नाट्याला वेगळे वळण!बांधकाम सभापती शोभा रोहणकार यांनी नगराध्यक्ष अनिता डवरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर पालिकेत राजकीय भूकंप झाला आहे. तथापि, रोहणकार यांनी राजीनामा दिला की त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले, अथवा त्यांना वर्तणुकीमुळे राजीनामा देण्यास वरिष्ठांनी सांगितले, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगत आहे.
नगरसेवक पदाच्या राजीनाम्याचाही अल्टिमेटम!पालिकेत दुसºयांच्या इशाºयावर कामकाज करण्यास स्पष्ट नकार देत, बांधकाम सभापती पदाचा राजीनामा सादर करणाºया शोभा रोहणकार यांनी नगरसेवक पदातही आपणाला कोणतेही स्वारस्य नसल्याचे पक्षश्रेष्ठींकडे नमूद केले. तसेच शोभा रोहणकार यांच्या नगरसेवक पदासोबतच त्यांचे पुत्र तथा माजी उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक पदाधिकारी असलेले महेंद्र रोहणकार यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा सादर करण्याचा अल्टिमेटम दिल्याचा दावा विश्वसनीय सूत्रांचा आहे. त्याचवेळी स्वीकृत नगरसेवक संदीप वर्मादेखील आपल्या राजीनाम्यावर अडून आहेत.
काँग्रेस नगरसेवक गैरवर्तणूक प्रकरणावर ‘विरजण’!खामगाव पालिकेच्या विविध सभांमध्ये वारंवार गोंधळ तसेच सभेची नोटीस वेळेत पाठविल्यानंतर ती न घेता वेळेवर मिळाली नसल्याचे सांगून काही नगरसेवकांकडून गैरवर्तनप्रकरणी नगराध्यक्ष अनिता डवरे यांनी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना नोटीस बजावली. या नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी पालिकेची २१ मार्च रोजी खास सभाही घेण्यात आली, त्यानंतर यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात येत असतानाच, अचानक सत्ताधाºयांची आपसातच जुंपली.