- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सायकल वारीतून भक्ती आणि शक्ती वृध्दींगत होण्यास मदत होते. या वारीतून प्रदुषण मुक्तीचा संकल्प असून पर्यावरण रक्षणासाठीच नाशिक-शेगाव सायकल यात्रा आयोजित केली जाते. नाशिक-शेगाव सायकलवारीचे प्रणेते प्रल्हाद अण्णा भांड यांच्याशी साधलेला संवाद.नाशिक-शेगाव सायकल यात्रेला कधीपासून सुरूवात केली?वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी पर्याय म्हणून सायकल वापरण्यास सुरूवात केली. सायकल वापरण्यामुळे आरोग्यावर चांगले परिणाम दिसायला लागले. त्यानंतर सायकल-डे ही संकल्पना राबविली. या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील तीर्थ स्थळांना भेटी देण्यास सुरूवात झाली. त्यानंतर सन-२००० साली नाशिक-शेगाव सायकल यात्रेला सुरूवात करण्यात आली.
सायकल वारीतील वाढत्या सहभागाबाबत काय सांगाल?सुरूवातीला मित्र मंडळीत सायकल वापरण्याचे महत्व पटवून दिले. आरोग्याचे महत्व पटलेले काही जण सुरूवातीला सोबत जुळले. त्यानंतर अनेकांना सायकल वापरण्याची अनुभूती आली. अनेकांची श्रध्दा वृध्दीगंत होण्यासही मदत झाली. त्यामुळे आता एक मोठी टीम तयार झाली. आता मै अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर लोग साथ आते गऐ और कारवॉ बनता गया असाच प्रत्यय शेगाव-नाशिक सायकल वारीत येत आहे. महाराष्ट्रातील पहिली सायकल वारी सुरू केल्याचे समाधानही आहे.
सायकल वारीच्या आजपर्यंतच्या उपलब्धी बाबत काय सांगाल?आजच्या धकाधकीच्या जीवनात पंढरपूर-आळंदी-शेगाव पायदळ वारी करणे प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे अध्यात्मातून विज्ञानाकडे भक्तीतून शक्तीकडे अशी ही सायकल वारीची वाटचाल सुरू आहे. या वारीत अनेक जण दिवसेंदिवस जुळत आहेत. वारीत अनेकांचा सहभाग वाढत आहे. नाशिक-शेगावपर्यंत अनेकांशी ऋणानुबंध वृध्दीगंत होत आहे. ही मोठी उपलब्धी या सायकल वारीची आहे.
नाशिक-शेगाव सायकलवारीतून समाजाला संदेश काय?विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराजांनी आपल्या चमत्कारातून अन्न वाया न जाऊ देण्याचा मंत्र दिला आहे. महाराजांनी जीवदयेचाही मंत्र दिला आहे. या मंत्राचा प्रत्येकाने अंगिकार करावा. पर्यावरण रक्षणाची कास धरावी. थोडक्यात, सर्व धर्मांची एकच शिकवण, पर्यावरणाचे करा रक्षण, हाच संदेश आपला या सायकलवारी द्वारे प्रामुख्याने युवक वर्गांसह संपूर्ण समाज बांधवांना राहणार आहे.