लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : गावकऱ्यांच्यावतीने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामसभेत बुधवारी घेण्यात आला. भारतीय सीमेवर चिनी ड्रगनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. विस्तारवादी भूमिका असलेले शत्रुराष्ट्र चीन नेहमीच युद्धाची भाषा करीत आहे. चीनच्या या आगळिकीला भारतीय सैन्याने विरोध करीत चिनी सैन्याला रोखून धरले आहे. शत्रुराष्ट्र चीन आपल्या देशात चिनी वस्तू विकून भारतीय लोकांच्या पैशांतूनच तयार झालेली हत्यारे आपल्यावरच रोखत आहे. चीनला रोखण्यासाठी सीमेवर आपले जवान प्राणाची बाजी लावत असतात. आपण चिनी वस्तू वापरणे हे देशहिताचे नसल्याने चिनी वस्तूवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार सुलतानपूरवासीयांनी केला. यासाठी १९ जुलै रोजी सकाळी गावातून भव्य बहिष्कार रॅली काढण्यात आली. स्थानिक शैक्षणिक संस्था तसेच गावातील तरुणवर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुन मेरे भाई, सुन मेरी बहना, कभी न लेना मेड इन चायना, चिनी मालावर बहिष्कार हाच आमचा निर्धार, चिनी वस्तूंचा वापर करू नका, चीनला युद्धाला मदत करू नका, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. विवेकानंद स्टडी सेंटरच्यावतीने यावेळी माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत भवनावर झालेल्या समारोपाप्रसंगी पं.स. सदस्य डॉ.हेमराज लाहोटी, आशकसेठ, जिल्हा संघचालक शांतीलाल जैन, विजय खोलगडे, प्रा.पारीख, प्रो.सोळंकी, डॉ.विनोद भानापुरे यांची यावेळी भाषणे झाली. विजू ढवळे, गणेश रत्नपारखी, पुरुषोत्तम मोरे, सखाराम जाधव, अयुब पठाण, नंदकिशोर भानापुरे, वाकोडे, शिवाजी सुरुशे, बंडू भानापुरे, मेहरशहा, महावीर जैन, रवी रिंढे, निवृत्ती कडूकर, प्रदीप गाडेकर, गजानन जाधव, बाळू पाटील, राम देशमाने, शरद पाटील, आनंद झोरे, विजय खेत्री, संतोष पाटील, सरपंच गजानन भानापुरे, ग्रामविकास अधिकारी डव्हळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन वैभव टकले यांनी केले.
चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा ग्रामसभेत ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:11 AM