खामगाव : केंद्र शासनाने देशभरातील कृषी केंद्रावर कृषी पदवीधर किंवा पदवीधारकांना ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाविरोधात देशभरातील कृषी केंद्रधारकांनी मंगळवारी एकदिवशीय बंद पुकारला होता. या बंदला बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली खामगाव, शेगाव, मलकापूर येथे चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील कृषी केंद्रधारकांनी सहभाग घेत दिवसभर कृषी केंद्र बंद ठेवली. हा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी कृषी साहित्य विक्रेता आणि उत्पादक असो.ने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. केंद्र शासनाने अधिसूचना काढून देशभरातील कृषी केंद्र संचालकांना खाते व कीटकनाशके यांचा नवीन परवाना हवा असेल तर त्यांनी कृषी केंद्रावर बी.एस्सी किंवा कृषी पदविकाधारकाला ठेवणे बंधनकारक केले आहे. यानुसार खते व बियाणे विक्रीकरिता कृषी पदविका व कीटकनाशक विक्रीकरिता पदवी आवश्यक आहे. ज्यांच्याकडे ही पदवी किंवा पदविका नसेल त्यांना दोन वर्षात प्राप्त करुन घेण्याचे आदेश दिले आहेत; मात्र दोन वर्षात ही पदवी मिळू शकत नाही, त्यामुळे या निर्णयाविरोधात कृषी केंद्रधारकांनी बंद पुकारला होता. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून कृषी केंद्र चालविणार्यांची अडचण झाली आहे. कारण या व्यवसायातील बरेच जण कृषी पदवीधर नाहीत. जिल्ह्यात सुमारे ११00 च्या जवळपास कृषी केंद्र असून, यापैकी ९0 टक्के दुकानदारांकडे कृषी पदवी व पदविका नाहीत. शासनाच्या या निर्णयामुळे बहुतांश कृषी केंद्र संचालकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. शेगाव येथेही बंद ठेवून तहसीलदार गणेश पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी अरूणसिंह मोहता, गजानन बुच, ज्ञानेश्वर इंगळे, ठाकरे, भगवंत पुरी, आनंद धानुका, मयूर अग्रवाल, रवींद्र शेगोकार, भूषण पारस्कर, संदीप गणगणे, नंदु पाटील, संतोष गिरी, भगवान हिंगणे, संतोष गाजरे, विजय ददगाळ, रवींद्र खुटाफळे, दिलीप गांधी, विक्रम गाढे, भुपेन्द्र सोनटक्के उपस्थित होते. मलकापूर येथेही दुकाने बंद ठेवून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
कृषी केंद्रधारकांच्या बंदला प्रतिसाद
By admin | Published: February 10, 2016 2:06 AM