शनिवारीही बुलडाणा पोलिसांनी जवळपास ३७ जणांवर कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पोलिस, महसूल व पालिकेचे पथक कार्यरत होते. बुलडाणा जिल्ह्याचा रुग्ण दुपटीचा वेग ३३ दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर संक्रमण रोखण्यासोबतच त्याची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचललेली आहेत. त्याची संपूर्ण जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. दोन दिवस हा लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यास बुलडाणा शहरासह जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे.
सोबतच नियमांचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. सध्याच्या या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुषंगाने बुलडाणा शहरामध्येही चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
दुसरीकडे संपूर्ण वर्षभरात आतापर्यंत बुलडाणा पालिकेने जवळपास ११ लाख रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. गेल्या वर्षी सात लाख ४३ हजार रुपयांचा दंड कारवाईदरम्यान वसूल केला होता. यात मास्क न लावणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यासह अन्य कारणांसाठी हा दंड करण्यात आला होता.