लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने प्रशासनाने हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवरदेखील प्रतिबंध लावले आहेत. मात्र, शहरातील बहुतांश रेस्टॉरंटस्, किराणा व्यावसायिक, स्टेशनरी आणि इतर साहित्याचे दुकानदार नियमाला धाब्यावर बसवून छुप्या पद्धतीने ग्राहकांना प्रवेश देत आहेत. पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असतानादेखील त्यांना कशाचीही भीती नसल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून येत आहे. कोरोना रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस् संचालकांना रात्री ९ वाजेपर्यंतची मर्यादा घालून दिली आहे. तथापि, शहरातील बहुतांश रेस्टॉरंट्स चालकांकडून त्याचे पालनदेखील होत असले तरी, काही अतिआगाऊ मालकांकडून याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. त्याचप्रमाणे काही किराणा व्यावसायिक आणि किरकोळ व्यावसायिक संचारबंदीच्या मुदतीची वेळ संपल्यानंतरही आपली दुकाने सुरू ठेवत असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांना सकाळी ९ ते ५ ही वेळ ठरवून दिली आहे. मात्र, या वेळेनंतरही संबंधित दुकानांचे संचालक रात्री उशिरापर्यंत आपली दुकाने उघडी ठेवत असल्याचे ‘लोकमत’च्या रिअॅलिटी चेकमध्ये आढळून आले. यापैकी अनेक दुकानांवर गर्दी होत असून, दुकानदारांसोबतच ग्राहकही मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येते. मात्र, पालिका पथकाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.
बाहेरून शटर बंद, आत दुकान सुरू! गृहोपयोगी साहित्याच्या दुकानासह, कापड, चप्पल आणि झेरॉक्स सेंटर तसेच स्टेशनरीची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्या जात आहे. काही दुकानांचे शटर बाहेरून बंद असतानाही आतून दुकान सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे.
कोरोना रूग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी कोरोना-१९ नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोना नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.-सुनील अंबुलकरशहर पोलीस निरीक्षक, खामगाव.