किनगाव जट्टू येथून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या खापरखेड लाड या छोट्याशा गावातील नागरिकांनी लोकसहभागातून जुन्या मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिर नव्याने बांधून विविध मूर्तींची प्राणप्रतिष्ठा त्याठिकाणी केली. कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करून रामदास महाराज सरकटे देवाची आळंदी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले होते. यामध्ये दररोज सकाळी काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन झाले. कीर्तनामध्ये महाराजांनी आजचा जमाना व्यसनाधीन होत असल्याने त्याचा काय परिणाम होतो हे सांगितल्यामुळे गावांमधील काही तरुणांनी माळ घातल्या व दारूचे व्यसन सोडण्याचा निर्धार केला. शुक्रवारी होम हवन विधिवत पूजाअर्चा करून हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी, गणपती व श्री संत भगवान बाबा यांच्या मूर्तींची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली.
टाळ, वीणा, पखवादाचा निनांदा
शनिवारी सकाळी टाळ, वीणा, पखवादाच्या निनादात गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन कलश घेऊन सहभाग घेतला होता. स्थानिक बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपरिक पद्धतीचे वेशभूषा करून दिंडीमध्ये सहभाग नोंदविला. रामदास महाराज सरकटे देवाची आळंदी यांचे काल्याचे कीर्तन झाले. कोरोना नियमांचे पालन करून यावेळी महाप्रसाद वितरित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील भाविकांनी अथक परिश्रम घेतले.