पालिकेकडून तलावांच्या ठिकाणी विद्युत दिवे लावून तलाव प्रकाशमय करण्यात आला आहे. निर्माल्यासाठी २३ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदाही कोरोनामुळे गणेशोत्सवावर सुरुवातीपासूनच अनेक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. अगदी गणरायाच्या मूर्तीपासून त्याच्या स्थापना, आरती, दर्शन आणि आता मिरवणुकीवरही निर्बंधच आहेत. भाविकांना विसर्जनासाठी गर्दी करता येणार नाही, त्यासाठी एका गणपतीसोबत पाच भाविकांचीच उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी दिसून आली आहे.
काय आहेत निर्बंध...
१. विसर्जन मिरवणुका काढण्यावर बंदी.
२. विसर्जनवेळी पाच लोकांचीच उपस्थिती.
३. विसर्जनाची आरती घरी करून विसर्जनस्थळी जास्त वेळ थांबू नये.
४. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे.
नगरपालिकेची संपूर्ण तयारी
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा नगरपालिकेची संपूर्ण तयारी झाली आहे. निर्माल्य गोळा करण्यासाठी घंटागाड्या व ट्रॅक्टर सज्ज करण्यात आलेले आहेत. बुलडाणा शहरातील विसर्जनस्थळाच्या ठिकाणी त्यामध्ये तलाव, विहीर याठिकाणी हे वाहने निर्माल्य गोळा करण्यासाठी उभे राहणार आहेत. बुलडाण्यातील तलावांच्या ठिकाणी बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत.
भाविकांनी नियमांचे पालन करावे
गणेश विसर्जनासाठी नगरपालिकेची संपूर्ण तयारी झाली आहे. भाविकांनी निर्माल्य हे नगरपालिकेच्या वाहनातच टाकावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व भक्तांनी नियमांचे पालन करून साधेपणाने गणरायाचे विसर्जन करावे.
-गणेश पांडे, मुख्याधिकारी, नगरपालिका, बुलडाणा
घरच्या घरी विसर्जनावरही भर
कोरोना संसर्गामुळे विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये, यासाठी गणरायाचे विसर्जन घरच्या घरी साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विसर्जनाच्या गर्दीत जाणे टाळून कोरोनापासून संरक्षणाच्या अनुषंगाने यंदा घरच्या घरी विसर्जनावर भर राहणार आहे.
बुलडाण्यातील विसर्जन स्थळावरील नियोजन
२० घंटागाड्या
३ ट्रॅक्टर
४० टेबल
१५ कर्मचारी