दरम्यान, पोलीस प्रशासन महसूल व पालिका प्रशासनाच्या समन्वयातून काम करणार आहे. जिल्ह्यांतर्गत २४, आणि आंतरजिल्हा सीमांसह चार आंतरराज्य सीमांवरही पोलिसांची नाकाबंदी करण्यात आली असून, रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे.
--आंतर जिल्हास्तरावरील बस वाहतूक बंद--
अत्यावश्यक सेवेमध्ये गणल्या जाणाऱ्या व्यक्तींनाच प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील अंतर्गत बससेवा सुरू होती. शासकीय कार्यालयातील कर्मचारी व अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्यांसाठी त्यामुळे सुविधा झाली. मात्र, आंतरजिल्हा स्तरावरील बस वाहतूक मात्र बंद ठेवण्यात आली होती, अशी माहिती विभागीय वाहतूक ए. यू. कच्छवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे आंतरजिल्हा वाहतूक करणाऱ्या ५० पेक्षा अधिक बसेस गुरुवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या.
--निर्बंधांच्या अंमलबजावणीला प्रथम प्राधान्य--
जिल्हा पोलीस दलाची १५ एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन आगामी १५ दिवसांसाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंध आणि संचारबंदीची अंमलबजावणी करण्यास प्रथम प्राधान्य द्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. यातही प्राधान्याने गर्दीची ठिकाणे टार्गेट केली जाणार आहेत. महसूल, पालिका प्रशासनाशी समन्वय ठेवून पोलीस प्रशासनाने कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच प्रसंगी मानवी संवेदनशीलता जपली जावी, अशा स्पष्ट सूचनाही दिल्या आहेत. १४ एप्रिल रोजीच्या बंदोबस्तामुळे १५ एप्रिल रोजी संचारबंदीसंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्याने १६ एप्रिलपासून जिल्ह्यातील एकंदरीत चित्र बदलेले असा कयास व्यक्त केला जात आहे.