कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कोरोना विषाणूची रुग्णसंख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. यामुळे प्रशासनाने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या आहेत. यामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी पुन्हा नवीन समित्या स्थापन करून त्या समितीच्या माध्यमातून या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. मेहकरचे तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी मेहकर येथील मंगल कार्यालयांना याबाबत नोटीस दिल्या आहेत. लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त जणांची उपस्थिती असल्यास मंगल कार्यालयाच्या संचालकासह वर-वधू पित्यावर कडक कारवाई करण्यात येईल. याशिवाय लग्नसमारंभात विना मास्क वऱ्हाडी फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे. मेहकर शहरात होणाऱ्या विविध सामाजिक व धार्मिक सोहळ्यावर प्रशासनाची करडी नजर राहणार असून याठिकाणी लोकहिताच्या कल्याणाकरिता राबविण्यात येणाऱ्या नियमाची पायमल्ली करताना आढळल्यास त्याच्यावर सक्तपणे कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांनी नगरपालिका व पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
कोट...
शहरातील प्रिंटिंग प्रेस संचालकांनी सुद्धा विविध समारंभाच्या कार्यक्रम पत्रिका या प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीत म्हणजे ५० छापाव्यात. मोठ्या प्रमाणावर पत्रिका छापलेल्या आढळल्यास त्या प्रिंटिंग प्रेस संचालकावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
डाॅ. संजय गरकल, तहसीलदार, मेहकर.