बुलडाणा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल १६ जुलै राेजी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल ९९.९८ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील केवळ पाच विद्यार्थी नापास झाले, तर ३८ हजार ४१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्यातील ५४६ शाळांमधील ४० हजार ६३४ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यापैकी ४० हजार ९०८ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यापैकी ४० हजार ९०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केवळ पाच विद्यार्थी नापास झाले आहेत. जिल्ह्यातील २१ हजार २४५ मुले व १९ हजार ६५९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्ण हाेण्याची टक्केवारी ९९.९९ टक्के, तर मुलींची ९९.९८ टक्के आहे.
काेराेनामुळे गतवर्षीपासून शाळा बंदच हाेत्या. त्यातच काेरोनाची दुसरी लाट आल्याने मार्च महिन्यात इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या हाेत्या, तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याची घाेषणा शासनाने केली हाेती. त्यानुसार शाळास्तरावर हे मूल्यांकन करण्यात आले. शाळांनी पाठविलेल्या मूल्यांकनाच्या आधारे १६ जुलै राेजी निकाल जाहीर करण्यात आला आहे.
१० तालुक्यांचा निकाल १०० टक्के
जिल्ह्यातील १३ पैकी १० तालुक्यांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, लाेणार, खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामाेद, नांदुरा, मलकापूर, माेताळा तालुक्यांचा समावेश आहे, तसेच बुलडाणा तालुक्याचा ९९.९७, मेहकर तालुक्यात ९९.९७, शेगाव ९९.८७ टक्के निकाल लागला आहे.
पाच विद्यार्थी नापास
अंतर्गत मूल्यमापनावर निकाल लागूनही पाच विद्यार्थी नापास झाले आहेत. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील एक विद्यार्थिनी, मेहकर तालुक्यातील एक विद्यार्थिनी आणि शेगाव तालुक्यातील एक विद्यार्थी व दाेन विद्यार्थिनींचा समावेश आहे.
वेबसाइट क्रॅश झाल्याने निकाल पाहण्यात अडचणी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दुपारी १ वाजता निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. त्यानंतर काही वेळातच वेबसाइट क्रॅश झाल्याने निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना अडथळे आले हाेते. अनेक विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहताच आला नाही.