लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी इयत्ता पाचवी आणि आठवी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल सप्टेंबर मध्ये लावण्याची घोषणा परीक्षा परीक्षा परिषदेने केली होती. मात्र, सात महिन्यांनतरही हा निकाल लावण्यात परीक्षा परिषदेला यश आलेले नाही. पेपेरमध्येही मोठ्या प्रमाणात चुका आढळून आल्या होत्या. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध केंद्रावर शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील इयत्ता पाचवीच्या १५ हजार २१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी पहिला पेपर १४ हजार ४३६ विद्यार्थ्यांनी दिला होता. तसेच पेपर क्र.२ साठी १४ हजार ९८२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १४ हजार ३८८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. तसेच इयत्ता आठवीच्या पहिल्या पेपरसाठी १२ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे भरले होते. त्यापैकी १२ हजार ३२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तसेच दुसऱ्या पेपरसाठी १२ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी आवेनदनपत्र भरले होते. त्यापैकी १२ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.मार्च महिन्यात कोरोना संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाउन वाढला. त्यामुळे, परीक्षेचा निकालही खोळंबल्याचे चित्र आहे. राज्यभरातील १० लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. निकाल केव्हा लागणार याविषयी घोषणा झालेली नाही.निकाल जाहीर करण्याची मागणीराज्यभरात अन्य स्पर्धा परीक्षा उशीरा होउनही त्यांचे निकाल जाहीर झाले आहे. मात्र, राज्य परिक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी होत आहे.