चिखली : तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींपैकी पाच गावांची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. उर्वरित ५५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यामध्ये ५५८ विजयी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. स्थानिक तालुका क्रीडा संकुल परिसरात निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
चिखली तालुक्यातील मुदत संपलेल्या एकूण ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर यातील पाच ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित ५५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी सर्वत्र शांततेत मतदानप्रक्रिया पार पडली. एकूण ६० ग्रामपंचायतींच्या २०२ प्रभागांमधील ५५८ जागांसाठी १ हजार ११८ उमेदवारांनी या निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावले. १८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व मतमोजणी पूर्ण झाली. सदर निवडणुकीच्या निकालासाठी स्थानिक तालुक क्रीडा संकुल परिसरात मोठी गर्दी उसळली होती. मतमोजणी परिसरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर झाली नसली तरी मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींत प्रामुख्याने काँग्रेस व भाजपाप्रणीत पॅनलमध्येच चुरशीची लढत पहावयास मिळाली. दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायतीवर आपापल्या पक्षवर्चस्वाचा दावा केला आहे.