लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : अत्यावश्यक सेवेत मोडत नसतानाही शहरातील काही व्यवसायिकांनी आपली दुकाने सुरू करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न चालविला होता. या बाबीची गांभीर्याने दखल घेत तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे व मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी पुढाकार घेत संयुक्त मोहीम राबवून उघडी असलेली दुकाने बंद केली. दुकानदारांना समज देत कोरोना संदर्भातील नियमांचे व्यावसायिकांनी तसेच नागरिकांनी पालन करावे असे आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यावसायिकांची दुकाने बंद ठेवण्याची तसेच जमावबंदी असतानाही शहरातील अनेक दुकाने मंगळवारी सकाळी राजरोसपणे उघडली. त्याचप्रमाणे अनेक जण रस्त्यावर विनाकारण फिरत होते. या बाबीची दखल घेत तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे न.प. मुख्याधिकारी रमेश ढगे, नायब तहसीलदार बाळासाहेब दराडे, मंडळ अधिकारी पवार, एदलाबादकर, बाळू जाधव यासह महसूल व न.प. कर्मचाºयांनी संयुक्तरीत्या रस्त्यावर उतरत पोलीस बंदोबस्तात अनधिकृतरित्या सुरु असलेल्या दुकानांकडे आपला मोर्चा वळला. त्यामुळे दुकाने तातडीने बंद करण्यात आली. तसेच अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते यांनी तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, तसेच ४५ वर्षावरील नागरिकांनी कोरोनाचे लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या. यानंतर पुन्हा मोहीम आखण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाइ करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मलकापुरात महसूल व नगर परिषद प्रशासन उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 11:41 AM