आमदार संजय गायकवाड यांनी नगरपंचायतीच्या संबंधित अधिकाऱ्यांना शहरामधील संपूर्ण रस्ते, संपूर्ण नाल्या तसेच शहरामध्ये आवश्यक असणारे पूल यांचे सर्वेक्षण करून ताबडतोब याबाबतचा अहवाल सादर करावा असे निर्देश दिले. शहराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध होणार असून, यामध्ये शहरातील संपूर्ण रस्ते, नाल्या पूर्ण केल्या जातील व त्यापासून एकही वाॅर्ड वंचित ठेवला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मोताळा शहराची नळ योजना वीस वर्षांपूर्वी झालेली असल्यामुळे अनेक ठिकाणी पाइपलाइन नादुरुस्त आहे. आमदार संजय गायकवाड यांनी या बाबतीत अधिकाऱ्यांना निर्देश देऊन आगामी ५० वर्षांच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजनेचा आराखडा सादर करावा, असे निर्देश दिले. मोताळा शहरामध्ये नगरपंचायत जरी असली तरी अनेक सुविधांचा अभाव आहे. आगामी काळामध्ये मोताळा शहरामध्ये रस्ते, नाल्या या मूलभूत कामासोबतच, स्मशानभूमी सौंदर्यीकरण, खुल्या जागेचे सौंदर्यीकरण, बाजार व्यवस्थापन व विस्तारीकरण, खुल्या भूखंडांचे सौंदर्यीकरण, कचरा व्यवस्थापन आदी कामे सुरू केले जातील, असेसुद्धा त्यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून, आगामी काळामध्ये शहराचा चेहरामोहरा बदलून टाकू, असे त्यांनी आवर्जून सांगितले. आपण जेव्हा शहराला दोन कोटी रुपयांचा निधी दिला होता तेव्हा ही कामे करून दाखवण्याचे आव्हान नगरपंचायत सत्ताधारी काँग्रेसने आपल्याला दिले होते. ही कामे तर पूर्ण झालीच, परंतु अजूनही २० ते २५ कोटी रुपयांची कामे या शहरामध्ये होतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
माेताळा नगरपंचायतमध्ये आढावा बैठक संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:35 AM