माेताळा : आमदार संजय गायकवाड यांनी मोताळा तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मोताळा नगरपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेच्या आढावा घेतला, तसेच योजना सुरळीत चालावी यासाठी संबंधितांना सूचना दिल्या.
आमदार संजय गायकवाड यांनी मोताळा नगरपंचायतीच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. यापूर्वीही दोन ते तीन वेळा आमदार गायकवाड यांनी आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी नगरपंचायत प्रशासनाची करवसुली, वीज बिलासंदर्भातील समस्या, नागरिकांच्या समस्या या सर्वांचा आढावा घेतला. पाणीपुरवठा योजना सुरळीत चालवायची असेल तर करवसुली होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले; परंतु वसुलीसोबतच नागरिकांच्या समस्यासुद्धा सोडविल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. आढावा बैठकीमध्ये उपस्थित अनेकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या तक्रारी गायकवाड यांच्याकडे केल्या. त्यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन या बाबतीत त्वरित लक्ष घालण्याचे आदेश दिले. तेव्हा त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक देशमुख, तहसीलदार सोनवणे, मुख्यधिकारी वराडे, तसेच सर्व संबंधित पाणीपुरवठा अधिकारी, सर्व नगरपंचायत अधिकारी आणि शहरातील शिवसेना व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.