गेल्या महिन्यात ११ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुलडाणा जिल्ह्याच्या जल जीवन मिशनसंदर्भाने सविस्तर आढावा बैठक मुंबईत घेतली होती. त्यात आराखड्यातील काही त्रुटी व जुन्याच योजना नव्या नावाने अंतर्भूत होत्या. त्याबाबत फेरआढावा घेऊन सर्वंकष आराखडा बनविण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुषंगाने १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्याची बैठक घेण्यात येणार होती. मात्र कोरोना संसर्गाची व्याप्ती पाहता ही बैठक होवू शकली नव्हती. त्यानंतर चार दिवसापूर्वी ही बैठक घेण्यात येऊन त्यास जिल्हास्तरावर मान्यता देण्यात आली.
--४० टक्के गावांचा प्रश्न मिटेल--
नव्याने करण्यात येणाऱ्या या ५०६ योजनांमधून जिल्ह्यातील ४० टक्के गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्यास मदत होईल. यासोबतच आधीच्या काही योजना सध्या कार्यान्वीत आहे. जिल्ह्यातील नागरी भागातील सहा लाख लोकसंख्येला सध्याच नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बुलडाण्याचीही महत्वाकांक्षी ११३ कोटी रुपयांची खडकपूर्णा प्रकल्पावरील पाणीपुरवठा योजना मार्च अखेर कार्यान्वीत होण्याची शक्यता आहे. २०२४ पर्यंत प्रामुख्याने या योजना पुर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या याअंतर्गत ४७ कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.