देऊळगावराजा : देऊळगावराजा या पावन नगरीमध्ये श्रीलक्ष्मी व्यंकटेश भगवंताचे प्रत्यक्ष वास्तव्य आहे. या भगवंताच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या परिवार देवतांपैकी गणपती, देवी, गोपालकृष्ण, मल्हारी म्हाळसाकांत (खंडोबा), हनुमंत व तीन गरुड अशा एकूण आठ पंचधातूंच्या मूर्तींची अनादी कालापासून त्यावर होणाऱ्या धार्मिक उपचारांमुळे झीज झाली होती. त्यामुळे सुमारे ३२८ वर्षांनंतर शास्त्रानुसार त्यांचे नूतनीकरण करून प्रतिष्ठा करण्यात आली.
सर्व मूर्तींमधील तेजोत्तारण विधीनुसार तेज काढून ते आठ कलशांमध्ये संग्रहित करण्यात आले. त्या सर्व मूर्ती अगोदर ज्या धातूंच्या होत्या त्याच धातूंच्या, त्याच आकाराच्या व त्याच वजनाच्या कोल्हापूर येथून नवीन बनविण्यात आल्या. ठरल्यानुसार शास्त्रीय मुहूर्तान्वये ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या कालावधीमध्ये त्यांची पुनर्प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामध्ये ४० विद्वत् ब्रह्मवृंदांच्या साहाय्याने धार्मिक अनुष्ठाने करण्यात आली. त्यामध्ये प्रथम व द्वितीय दिवशी श्रीगणपती अथर्वशीर्षाचे १३०० पाठ, पुरुषसूक्ताचे १५०० पाठ, श्रीसूक्ताचे १६०० पाठ, श्री लक्ष्मी व्यंकटेशाला महारुद्र तथा श्रीखंडोबा, श्रीगोपालकृष्ण, श्री हनुमंत व श्रीगरुड यांचे त्यांचे गायत्रीचा जप अशी नानाविध अनुष्ठाने करण्यात आली. तृतीय दिवशी श्री दुर्गा सप्तशती पाठाची शतचंडी व प्राणप्रतिष्ठेला सुरुवात झाली. त्यामध्ये सर्वप्रथम प्रधान संकल्प करून श्रीगणपती पूजन, स्वस्ति पुण्याहवाचन, मातृकापूजन, वसोर्धारा पूजन, आयुष्यमंत्र जप, नांदीश्राद्ध, आचार्यादी ऋत्विजवरण, दिग्रक्षण, पंचगव्यकरण, वास्तुमंडल स्थापन, भूमिपूजन, अरणीमंथ्याच्या साहाय्याने अहिताग्नी श्री महादेव शास्त्री अग्निहोत्री यांच्या अधिपत्याखाली अग्निप्रज्वलन व स्थापन करण्यात आले. त्यानंतर योगिनी मंडल, द्वादशलिंगतो भद्रमंडल, मुख्यदेवता, क्षेत्रपाल, भैरव, ग्रहमंडल, मृत्युंजय अशा देवतांची स्थापना व त्यांचे पूजन झाले. या कार्यक्रमाचे देवाचे प्रतिनिधित्व म्हणून यजमानपद उदय पुजारी, गिरीश पुजारी, मयूर पुजारी तथा समस्त पुजारीवृंद यांनी उत्तमरीतीने सांभाळले. कार्यक्रमाचे आचार्य पांडुरंग देवउपाध्ये, ब्रह्मदेव गोविंदराव टोणपे, मिलिंद लाडसावंगीकर, शशिकांत अग्निहोत्री, संदेश लाडसावंगीकर, विनायक टोणपे, गजानन टोणपे, रमाकांत देव, प्रमोद जपे, गोविंद देव, विजय देवउपाध्ये, श्रीपाद गोंदकर तथा समस्त ब्रह्मवृंद यांनी उत्तमरीतीने पौरोहित्य सांभाळले. रामेश्वर पाठक यांनी कार्यक्रमाची सर्व सूत्रे सांभाळली. बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांच्या पुढाकाराने सर्व कार्यक्रम पार पडला.