चिखली : सध्या कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगात थैमान घालत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक त्या उपचारासोबतच मनाची शांतीदेखील आवश्यक आहे. अध्यात्मामध्ये मनाला शांती देण्याची शक्ती आहे. अशावेळी विज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्यास क्रांती घडू शकते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील बुलडाणेकर यांनी केले.
रविकांत तुपकर यांच्या पुढाकाराने किन्होळा येथे कोरोना कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मनोबल वाढविण्यासाठी त्यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाची बिकट परिस्थिती पाहता गावोगावी विलगीकरण कक्ष उभारणे आवश्यक आहे, अशी संकल्पना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मांडली आणि त्यांच्या संकल्पनेतून किन्होळा येथे लोकसहभागातून जिल्ह्यातील पहिले कोविड आयसोलेशन सेंटर सुरू झाले. लोकसहभागातून आयसोलेशन सुरू करण्याच्या संकल्पनेसोबतच रविकांत तुपकर यांनी कोविड सेंटरमध्ये दाखल रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. यापूर्वी किन्होळा कोविड सेंटरमध्ये ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, शारीरिक उपचारासोबतच मानसिक उपचारांचीदेखील माणसाला मोठी गरज असते. कोरोनाच्या या संकटकाळात हरिनाम, भजन, कीर्तन आणि अध्यात्म मानसिक उपचारासारखेच ठरतात. मन तंदुरुस्त झाले तर शरीर आपोआप तंदुरुस्त होते. मनाला निरोगी ठेवण्यासाठी हरिनामाची आवड असणे आवश्यक आहे. भक्तीची शक्ती कोणतेही संकट सहज पार करून नेते, त्यामुळे ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि परमेश्वर आपल्यासोबत आहे, कोरोनाच्या संकटातून आपण सुरक्षित बाहेर पडू अशा आत्मविश्वासाने उपचाराला सहकार्य करा, असे आवाहनदेखील यावेळी हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले. यावेळी कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसोबतच रविकांत तुपकर, प्रभाकर बाहेकर, राजेश बाहेकर, मधुकर बाहेकर, दिनकर बाहेकर, सरपंच अर्चना जाधव, पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर यांच्यासह स्वयंसेवक या कीर्तनाला उपस्थित होते.