- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने शाळेतील शिल्लक असलेला पोषण आहाराचा तांदूळ व इतर धान्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश आहेत. जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत आतापर्यंत या आदेशाची अंमलबजावणीच झालेली नाही. बुलडाणा शहरातील काही शाळा व मलकापूरसह अन्य काही ठिकाणच्या शाळेतील पोषण आहाराचा तांदूळ वितरणाला मुहूर्त मिळाला नाही.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा, अंगणवाड्या बंद आहेत. शाळेमध्ये शिल्लक असलेले पोषण आहाराचे धान्य वितरण करण्याबाबत गेल्या महिन्याभरापूर्वीच शासनाने आदेश दिलेले आहेत. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील सर्व शाळेतील पोषण आहाराचा तांदूळ, डाळी व इतर धान्य विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरी भागातील शाळेमधील तांदूळही वितरणाच्या सुचना देण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातील वितरणाचे काम पूर्ण झालेले आहे; परंतू शहरी भागातील पोषण आहाराचे धान्य वितरण करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण शहरी भागात असल्याने प्रशासनाकडूनही या भागात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील जिल्हा परिषद, नगर पालिकेच्या शाळेतील तांदूळ वितरणास स्थानिक प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक, योजनेचे काम पाहणारे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी तांदुळ शिल्लक साठा विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटपाचे नियोजन पूर्ण केलेले आहे. परंतू आतापर्यंत बुलडाणा शहरातील काही शाळा, मलकापू शहरातील सर्वच शाळा व जिल्ह्यातील शहरी भागातही काही ठिकाणच्या शाळांमध्ये तांदूळ वाटपाची अंमलबजावणी झालेली नाही.पालकांना पोषण आहाराच्या धान्याची प्रतीक्षाशहरी भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव बघता, शहरातील कोणत्या भागामध्ये तांदुळ कधी वितरीत करावा, याबाबतचा निर्णय नगर पालिका, नगर परिषद किंवा नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना घ्यावयाची आहे. कोणत्या भागामध्ये प्रथम प्राधान्याने तांदुळ वितरीत करावयाचा आहे, याची निश्चिती न झाल्याने मलकापूर शहरात अद्याप तांदुळ वितरणाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे पालकांना पोषण आहाराच्या धान्याची प्रतीक्षा आहे.
बुलडाण्यातील काही शाळा व मलकापूरमधील शाळांमध्ये तांदूळ वाटप झालेले नाही. अन्य ठिकाणच्या शाळेतील तांदूळ वितरणाचे काम पूर्ण झालेले आहे.- एजाज खान,शिक्षणाधिकारी बुलडाणा.