- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : अश्मयुगापासून तर ब्रिटीश काळापर्यंतच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या भोन गावाला प्राचीन वारसा लाभला आहे. भोन जिगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणार आहे. प्रकल्प पूर्ण होण्याआधीच येथे ऐतिहासिक दृष्टीकोणातून सखोल उत्खनन करून इतिहास समोर आला नाही तर संपूर्ण इतिहास नेहमीसाठी पाण्याखाली गडप होणार आहे.संग्रामपूर तालुक्यातील भोन येथे आतापर्यंत तीन वेळा पुरातत्व खात्याच्यावतीने उत्खनन करण्यात आले. या उत्खननात बौद्ध स्तूप आढळला. तसेच या स्तुपाभोवती प्रदक्षीणापथही आढळला. सम्राट अशोकाने देशभरात ८४ हजार स्तूप निर्माण केले होते. त्यापैकीच एक स्तूप भोन येथे स्थापन केला होता. त्यामुळे या गावाला ऐतिहासिक महत्व आहे. भोन गावात इ.स. पूर्वपासून मानवी वस्ती आहे. त्यामुळे त्यानंतरच्या काळातही सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूटांनी बांधकाम केलेले असेल. काळानुसार या वास्तू जमिनीखाली गाडल्या गेल्याची शक्यता आहे. मात्र, जिगाव प्रकल्प झाल्यानंतर हा संपूर्ण इतिहास पाण्याखाली गडप होणार आहे.खामगाव येथील इतिहास संशोधक डॉ. शाम देवकर यांनी भोनच्या इतिहासाबद्दल माहिती देताना सांगितले, की चीनी प्रवासी हुएत्संग याने बुद्धिष्ट रेकॉर्ड आॅफ वेस्टर्न वर्ल्ड या प्रवासवर्णनाच्या सी- यू- की मधील नोंदीनुसार वर्णन केलेले संदर्भ भोनशी जुळतात. हुएत्संगने या ठिकाणी पाच स्तूप व अनेक संघाराम असल्याचे म्हटले आहे. पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात एक स्तूप निर्दशनास आला आहे. तसेच अश्मयुगीन मानवाची हत्यारे, मातीने भाजलेले त्रिशरण शिल्प, सातवाहन काळातील नाणी, मातीचे अलंकार, सुलतान शाहीतील नाणी आढळले आहेत. त्यामुळे येथे आणखी उत्खनन करून इतिहास समोर आणण्याची गरज आहे.तीन वेळा झाले संशोधनपुरातत्व खात्याचे संशोधक बी. सी. देवतारे यांनी २००३ ते २००८ दरम्यान या ठिकाणी उत्खनन केले. यादरम्यान या उत्खननादरम्यान त्यांनी प्राप्त केलेल्या वस्तुंचे कार्बन टेरींगव्दारे कालमापन केले आहे. त्यानुसार हा कालखंड इ.स. पूर्व ३०० चा आहे. यावरून भोनचा स्तूप हा सम्राट अशोकाच्या कालखंडात बांधण्यात आला आहे.भोन येथे सम्राट अशोक कालीन बौद्ध स्तूप आढळला आहे. तसेच चिनी प्रवासी हुएत्संग याने याने केलेल्या प्रवासवर्णनानुसार येथे आणखी वास्तू आहेत. जीगाव प्रकल्प झाला तर संपूर्ण गाव पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी उत्खनन करून समृद्ध इतिहास समोर आणण्याची गरज आहे.- डॉ. शाम देवकर,इतिहास संशोधक, खामगाव.
भोन येथील समृद्ध इतिहास जाणार पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:21 AM
जिगाव प्रकल्प झाल्यानंतर हा संपूर्ण इतिहास पाण्याखाली गडप होणार आहे.
ठळक मुद्देभोन जिगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणार आहे. संपूर्ण इतिहास नेहमीसाठी पाण्याखाली गडप होणार आहे.