लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : विदर्भातील सर्वांत श्रीमंत गणेश म्हणून खामगाव येथील राणा नवयुवक मंडळाच्या ‘बाप्पां’ची सर्वदूर ख्याती आहे. सुमारे ७० लक्ष रुपयांची सोने आणि चांदी या गणेशमूर्तीला चढविण्यात आली आहे. भाविकांना सहज आणि थेट दर्शन या गणेशमूर्तीचे घेता येते. त्यामुळे खामगावचा राजा म्हणूनही हा गणेश परिसरात प्रसिध्द आहे.
लोकमान्य टिळकांच्या प्रबोधनाचा वारसा खामगाव शहरातील हिंदुसूर्य राणा नवयुवक दलाच्यावतीने जोपासल्या जातो. या गणेश मंडळाला ८० वर्षांचा इतिहास असून,खामगाव शहरात सर्वप्रथम आरोग्य आणि क्रीडा विषयक सेवा देण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला आहे. मजूर आणि सर्व सामान्य नागरिकांची म्हणजेच हातावर पोट असलेल्यांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या दाळफैलात या गणेशाची स्थापना केली जाते. गेल्या २२ वर्षांपासून राणा मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन केले जात नाही. हे या मंडळाचे वैशिष्टे असून, मंडळाने ७० लक्ष रुपयांची सोने, चांदी आणि दागीणे मूर्तीवर चढविले आहेत.
आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मंडळाकडून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. गणेशोत्सव काळासोबतच संकष्ट चतुर्थी आणि इतर धार्मिक उत्सवात मंडळाकडून विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात येता. मुलीचे ढोलपथक, लेझीम पथक या मंडळाचे वेगळे वैशिष्ट्ये आहे. श्री गणेश मिरवणुकीसाठी मंडळाने देखावा रथ तयार केला असून, हा रथ केवळ वर्षातून एकदाच बाहेर काढण्यात येतो. नगरप्ररिक्रमेद्वारे या रथासोबतच गणेश मूर्तीचे दर्शन घडते. गणेशोत्सव काळात दहाही दिवस भाविकांना श्री गणेशाचे म्हणजेच खामगावच्या राजाचे थेट दर्शन घेता येते. नवसाला पावणारा गणेश म्हणूनही या गणेशाची पंचक्रोशीत ओळख आहे.
दाळ फैलात हिंदूसुर्य महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तींचीही स्थापना मंडळाने केली आहे. येथे आकर्षक देखावाही मंडळाकडून उभारण्यात आला आहे.
दिन दुबळ्यांची सेवा!
खामगाव आणि परिसरात आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात राणा गणेश मंडळ सदैव अग्रेसर आहे. दाळफैलासह परिसरातील अनेकांना आरोग्य विषयक मंडळाने सेवा दिली आहे. विविध आरोग्य शिबिर, नेत्रतपासणी, रक्ततपासणी आणि मोफत चस्मे वितरणाचा लाभ आजपर्यंत २१ हजारावर गरजूंना राणा मंडळाने मिळवून दिला आहे. परिसरातील दिन, दुबळ्यांना हवी तशी मदत देणारे हे मंडळ असून, रडणाºयाला कसे हसविता येईल, याचाच प्रयत्न मंडळाकडून केल्या जातो.