- अनिल गवई खामगाव : गत पाचवर्षांच्या कालावधीत जिल्ह्याच्या विकासाची गाडी योग्य रूळावर असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी येथे दिली.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खामगाव येथील जी. वी. मेहता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. शिवसेना-भाजपा-रासपा महायुतीचे बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी ही जाहीरसभा पार पडली.यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील विकासाच्या मुद्यांना हात घालताना, गत पाच वर्षांत खामगाव-जालना रेल्वे मार्गासह खामगाव जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र, खामगाव- जालना रेल्वेमार्गासाठी रेल्वेच्या अर्थसंकल्पात ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रीया सुरू आहे. त्यामुळे गेल्या ५० वर्षांत ज्या विषयाला कुणीही हात लावत नव्हतं तो विषय पुढे सरकला. खामगाव जिल्हा निर्मितीच्या प्रक्रीयेनेही गती घेतली आहे. इतकेच नव्हे तर, बुलडाणा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीचाही प्रश्न मार्गी लागला आहे. दिलेलं वचन पाळणारांपैकी आपण असून, गत काही दिवसांमध्ये शिवसेना-भाजप युतीतील ‘खट्टा-मिठा’संबंधामुळं अनेक प्रश्न प्रलंबित होते. मात्र, यापुढे तुमच्या ताटात गोड वाढण्यासाठीच ही युती झाली असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जे ५० वर्षांत जमलं नाही; ते युतीनं पाच वर्षात केलं. यापुढेही शेतकरी, कष्टकरी आणि गोर गरीबांसाठी युतीची घोडदौड सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. सभेचे संचालन अॅड. बाबू भट्टड यांनी केले.या नेत्यांनी गाजविले मैदान !ना. रणजीत पाटील, ना. संजय राठोड, ना. गुलाबराव पाटील, खा. विकास महात्मे, शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर, आ. चैनसुख संचेती, आ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, आ. शशीकांत खेडेकर, आ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड यांचीही यावेळी समायोचित भाषणे झालीत. बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.मोबाईलच्या दिव्यात पटविली साक्ष!स्थानिक खामगाव येथील जी.वी. मेहता मैदानावर जिल्ह्यातील मतदार आणि युतीच्या शिलेदारांची भरगच्च गर्दी येथे जमली होती. सन २००९ आणि २०१४ च्या जाहीर सभांचा उच्चांकही शुक्रवारच्या सभेनं मोडीत काढला. मैदानावरील गर्दी दाखविण्यासाठी उपस्थितांच्या मोबाईलचे दिवे लावण्याचे आवाहन प्रतापराव जाधव यांनी करताच, मैदानावर सर्वदूर मोबाईलचे दिवे चमकले.गोपीनाथ मुंडे; भाऊसाहेबांचे स्मरण!लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्याचे सुपुत्र स्व. भाऊसाहेब फुंडकर यांची या सभेला प्रामुख्याने अनुपस्थिती जाणवली. आ. संजय रायमुलकर, आ. आकाश फुंडकर, प्रतापराव जाधव यांच्यासह दस्तुरखुद्द उध्दव ठाकरे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे आणि भाऊसाहेबांचे स्मरण केलं. त्यांच्या अनुपस्थित त्यांनी आयुष्यभर लढा दिलेल्या शक्तीला उभं करण्याच पातक करू नका!, असे भावनिक आवाहनही यावेळी उध्दव ठाकरे यांनी केले. उच्चांकी गर्दी ही दोन्ही लोकनेत्यांना श्रध्दांजली असल्याचे महायुतीचे नेते म्हणाले.
बुलडाणा जिल्ह्याच्या विकासाची गाडी योग्य रूळावर - उध्दव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 2:17 PM