हर्षनंदन वाघ / ऑनलाइन लोकमतबुलडाणा : जिल्ह्यात शिक्षण विभागाने कोणत्याही सुविधा नसलेल्या गावांना अवघड क्षेत्रात टाकले आहे. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना जिल्ह्यात इच्छूक ठिकाणी बदलीचे अधिकार मिळाले आहेत. तर त्यांच्या ठिकाणी शिक्षकांची बदली करण्याचे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना आहे.शिक्षक बदलीच्या अनुषंगाने अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशा परिसरातील शाळांच्या याद्या प्रशासनाने तयार केल्या आहेत. त्यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील सर्वात जास्त ९ शाळा अवघड क्षेत्रात नोंदल्या गेल्या आहेत. तर जळगाव जामोद तालुक्यातील ७ व खामगाव तालुक्यातील केवळ ३ शाळांची नोंद झाली आहे. शासनाने १५ मे २०१४ रोजी शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबत शासन आदेश काढला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वसाधारण व अवघड गावे निश्चित करण्यात आले असून अवघड गावातील शिक्षकांची जागा रिक्त राहू नये किंवा अशा शिक्षकाला ३ वर्षानंतर बदलीची संधी मिळावी हा उद्देश शासनाचा नवीन धोरणाचा आहे. याशिवाय शिक्षकांच्या बदल्या तालुक्यांतर्गत होत होत्या. शासनाच्या नव्या आदेशानुसार आता शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण जिल्हास्तरावरून ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या बदल्यांचे पूर्ण अधिकार असणार आहेत. ज्या शिक्षकांनी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त अधिक काळ सर्वसाधारण क्षेत्रात सेवा बजावली आहे, त्यांची बदली अवघड क्षेत्रात केली जाणार आहे. तर ज्या शिक्षकांनी अवघड भागात ३ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा बजावली आहे, त्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे.बदल्यांची प्रक्रिया पाच टप्प्यातजिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या पाच टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या शाळांमध्ये ठेवावयाच्या रिक्त पदापेक्षा कमी पदे रिक्त आहेत अशा शाळांमधील बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात दुर्धर आजार असलेले तसेच अपंग, विधवा, कुमारिका, परित्यक्ता वा घटस्फोटित महिला व ५३ वर्षावरील शिक्षक यांची इच्छा असेल तरच विनंती बदली केली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात पती-पत्नी एकत्रिकरणाअंतर्गत ३० किलोमीटर परिसरात संधी दिली जाणार आहे. मात्र दोघांपैकी एकजण बदलीपात्र असेल तरी दोघांमागे बदलीची अडचण येणार आहे. चौथ्या टप्प्यात अवघड क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर पसंतीक्रमांकानुसार केल्या जातील. अवघड क्षेत्रातील शिक्षकाची इच्छा असेल तरच ही बदली होईल. तर पाचव्या टप्प्यात "सर्वसाधारण" क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकाची सेवाज्येष्ठतेनुसार पसंतीक्रमाने बदली करण्यात येणार आहे. अर्थात अवघड क्षेत्रातील शिक्षकाने सर्वसाधारण शिक्षकाची जागा मागितली तरच सर्वसाधारण शिक्षकाची बदली होणार आहे.
अवघड क्षेत्रातील शिक्षकांना इच्छूक स्थळी बदलीचा अधिकार
By admin | Published: May 15, 2017 7:23 PM