शेतकरी पाऊस येण्याच्या अगोदर शेतजमिनी नांगरणी करून ठेवत असतात. नांगरणी केलेली शेतजमीन पिकांसाठी लाभदायक असते सध्या शेतशिवारात ट्रॅक्टरने नांगरणी करताना दिसून येत आहेत. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात असत. अलीकडे शेतकरी बैलजोडी वापरणे बंद करून शेतातील हंगामी स्वरूपात येणारी कामे ट्रॅक्टरने केली जात आहे. ट्रॅक्टरसुद्धा गावागावात दिसून येत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना गावात हंगामी स्वरूपात रोजगार उपलब्ध झाला आहे.
अन्य पिकासोबत कपाशी पिकाची लागवडसुद्धा शेतकरी करतात़ मृगाचा अपेक्षित पाऊस झाला तर लागवड करणे सोयीचे हाेते. त्यामुळे कपाशी लागवड करणाऱ्या शेतजमिनीत नांगरणी केली जात आहे. दरवर्षी काही शेतकरी जमीन भाड्याने घेऊन शेती करीत होते; मात्र शेतीची मशागत, पीक लागवड, बी- बियाणे, कापणी, मळणी, खर्च वाढत चालला असल्याने भाड्याने शेतजमीन करण्यास शेतकरी कानाडोळा करीत आहेत.
मागील वर्षीपेक्षा डिझेलच्या दरात तब्बल २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका शेवटी शेतकऱ्यांनाच बसत आहे़