लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव धाडः इंधन दरवाढीमुळे त्यातच डिझेलच्या दरवाढीमुळे शेतीसाठी उपयुक्त असलेल्या ट्रॅक्टर तसेच विविध उपकरणांवरील मशागतीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे गणित बिघडत चालले आहे. मशागतीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे आर्थिक ताळमेळ बसवणे अवघड झाले आहे.
सर्वसामान्य नागरिकांबरोबरच इंधन दरवाढीचा फटका आता शेतकऱ्याला ही बसत आहे. शेतीसाठी आता ट्रॅक्टरचा वापर अधिक होत आहे. ट्रॅक्टरसह शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांना इंधनाची गरज असते. ट्रॅक्टरमुळे वेळेची बचत होत असली तरी त्याला लागणाऱ्या इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे मशागतीच्या दरातही वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला यंदा ट्रॅक्टरची मशागत महाग वाटू लागली आहे.
यांत्रिकीकरणावर आधारित शेती सुरू झाल्यानंतर अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे पूर्वी बैलजोडी दिमाखात उभी असायची, त्याच दरात आता ट्रॅक्टर उभा असलेला दिसून येत आहे. पिकाच्या काढणीपासून ते शेतीच्या मशागतीची कामे अवघ्या काही तासात होत असल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करत आहे. शेतकऱ्याचा वेळ व परिश्रम यामुळे वाचत असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या साह्याने शेती करणारा शेतकरी आता ट्रॅक्टरला आपली पसंती देत आहे.
एकीकडे परिश्रम कमी व वेळेची बचत होत असली, तरी इंधन दरवाढीमुळे शेतीसाठी होणारा खर्च वाढतच आहे. बहुतांश शेतकरी भाडेतत्त्वावर शेतीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आता नांगरणी, मळणी आदींसाठी ज्यादा पैसे मोजावे लागत असल्यामुळे वाढलेल्या खर्चाचा ताळमेळ बसवणे अवघड बनले आहे.
यांत्रिकीकरणाचा शेतीमध्ये जसा शिरकाव झाला आहे तसे पारंपरिक पद्धतीने शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या बैलजोडी जवळपास हद्दपार होत चालल्या आहेत. सद्यस्थितीत शासनाने केलेल्या इंधन दरवाढीमुळे ९० टक्के शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पन्न कमी व उत्पादन खर्च अधिक या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
धामणगाव धाड: बुलडाणा तालुक्यातील धामणगाव परिसरात ट्रॅक्टरच्या साह्याने शेतकरी शेतीची मशागत करत आहेत. छायाचित्रः गणेश भालके