लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: स्थलांतरीत नागरिकांमुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. १९ दिवसात पॉझिटिव्ह आलेल्या २९ रुग्णांपैकी तब्बल २७ रुग्ण हे स्थलांतरीत असून प्रामुख्याने मुंबई, पुणे आणि अकोला जिल्ह्यातून ते आले आहेत. परिणामी परजिल्ह्यातून आलेल्यांमुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या दीड महिन्यात एकूण २४ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर २४ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र त्यानंतर जिल्ह्यात जवळपास एक लाख नागरिक हे पुणे, मुंबई व अन्य ठिकाणाहून जिल्ह्यात दाखल झाले आणि पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली. गेल्या १९ दिवसात सापडलेल्या २९ रुग्णापैकी शेगावचे दोन रुग्ण वगळता अन्य सर्व रुग्णांचे पुणे, मुंबई, अकोला आणि बºहाणपूर कनेक्शन आहे. त्यामुळे अद्यापही बुलडाणा जिल्ह्यात स्थानिक संक्रमण नसल्याचे चित्र आहे.परंतू मोठ्या प्रमाणावर आढळलेल्या या रुग्णांमुळे जिल्ह्यात आता संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. जळका भडंग येथे एकाच कुटुंबातील ९ जण पॉझिटिव्ह आढळून आले त्यावरून ही बाब स्पष्ट होत आहे.दुसरीकडे गेल्या दोन महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात जवळपास एक लाखापेक्षा अधिक नागरिक हे मुंबई, पुण्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल आहेत. या नागरिकांच्या जिल्ह्यातील आगमनादरम्यानच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्यास जिल्ह्यात प्रारंभ झाला.बुलडाणा जिल्ह्यात सध्या ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली असून त्यापैकी सध्या १८ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. आतापर्र्यंत ३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर तीन जणांचा मृत्यू झालेला आहे.सध्या जिल्ह्यात २१ प्रतिबंधीत क्षेत्र असून त्यामधील जवळपास ३८ हजार नागरिकांचे आरोग्यविषयक नियमित सर्व्हेक्षण होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख २५ हजार नागरिकांचे कोरोना संसर्गाच्या संदर्भाने सर्व्हेक्षण झाले आहे. सर्दी, ताप व खोकल्याच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
CoronaVirus : परजिल्ह्यातून स्वगृही आलेल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात संक्रमणाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:39 AM