लोणार: स्थानिक श्री शिवाजी हायस्कूल व महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे, यासाठी शाळेतच ‘आरओ वॉटर प्लांट’ सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शुद्ध पेयजलाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. तसेच यावेळी काही गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वितरणही करण्यात आले. आरओ वॉटर प्लांटचा शुभारंभ विमलबाई साहेबराव मापारी यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी अकोला येथील डॉ. भूषण मापारी, डॉ. सूनील मापारी, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. खुशालराव मापारी, संस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी, डॉ. उज्वला मापारी, डॉ. नंदिनी मापारी व संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक उपस्थित होते. दोन लाख रुपये किंमत असलेल्या हा आरटो प्लांट डॉ. सुनिल मापारी यांनी स्वखर्चातून बसविला आहे. त्यामुळे ३ ते ४ हजार विद्यार्थ्यांना दररोज शुद्ध पेयजल मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. सुनील मापारी यांनी ज्या शिक्षकांनी त्यांना घडविले त्या शिक्षकांचे व्यासपीठावर आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमांमध्ये दहावी व बारावीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली. कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे प्राचार्य गणेश मुंढे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप इंगोले, प्रा. बळीराम मापारी, संचालक राजेश मापारी संचालक डॉ. अनिल मापारी, डॉ. विक्रांत मापारी, राहूल मापारी, विजय मापारी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संचालन शेवाळे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांसाठी शाळेत बसविला ‘आरओ प्लांट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 6:16 PM