मलकापूर: तालुक्यातील दाताळा येथे जलयुक्त शिवार कार्यक्रम अंतर्गत नदीतील गाळ काढण्याच्या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी तहसीलदार, मंडळ अधिकारी गेले असताना, त्यांनी शिवारातील शेख यांच्या वीटभट्टीवर रॉयल्टी तपासणीसाठी भेट दिली. त्या ठिकाणी झालेल्या वादावादीनंतर तहसीलदारांच्या वाहनावर तुफान दगडफेक करीत, तोडफोड केल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.दाताळा येथील गाळ काढण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर तहसीलदार रवींद्र जोगी, मंडळ अधिकारी गुलाब पुंडलिक गवई व चालक दिलीप तायडे हे शासकीय वाहन (एमएच २८ सी ६८६८) ने पिंप्री गवळी रोडवरील शेख यांच्या वीटभट्टीवर मातीची रॉयल्टी तपासणीसाठी गेले. तेथे झालेल्या वादावादीनंतर तहसीलदारांच्या गाडीवर शेख बंधूंनी तुफान दगडफेक केली. दगडफेक सुरू होताच तहसीलदार, मंडळ अधिकार्यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेत सरळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. या घटनेची फिर्याद मंडळ अधिकारी गुलाब इंगळे यांनी दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून शे. इम्रान, शे. आसिफ, शे. अमिन या तिघा बंधूंविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादंविचे कलम ३५३, १0४, १0५, १0६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारनवरे करीत आहेत.
तहसीलदारांच्या वाहनावर दगडफेक
By admin | Published: March 21, 2016 1:53 AM