खापरखेड विदर्भ मराठवाड्याच्या सीमेलगत असून किनगाव जट्टू ग्रामपंचायतीला संलग्न आहे. खापरखेडलाड ते किनगाव जट्टू हे अंतर तीन किलोमीटर असून या रस्त्याचे पाचशे मीटर पर्यंत डांबरीकरण दोन वर्षांपूर्वी झाले आहे. अद्याप अडीच किलोमीटर रस्ता डांबरीकरणाचे काम बाकी आहे. रस्त्यावरील दगड उघडे पडले असल्याने या रस्त्याने वाहने चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खापरखेडा येथे पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा असून पुढील शिक्षणाकरिता मुलांना किनगाव जट्टू येथे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना या रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. किनगाव जट्टू गावाजवळ नारळी नदीवर गतवर्षी पाईप टाकून थातूरमातूर पूल करण्यात आला आहे. परंतु थोडा जरी पाऊस पडला तर पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद होतो. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करून पुलाचे काम तातडीने करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष सहदेव लाड, उपाध्यक्ष अनिल मोरे आदींची स्वाक्षरी आहे.
किनगाव जट्टू ते खापरखेड लाड रस्ता गेला खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:30 AM