साखरखेर्डा : साखरखेर्डा ते पिंपळगाव सोनारा - मेरा बु. रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे़ या रस्त्यावर अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत़ या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे़
साखरखेर्डा ते पिंपळगाव सोनारा -मेरा बु. या रस्त्याचे अंतर ९ किलोमीटर आहे. साखरखेर्डा ते पिंपळगाव सोनारापर्यंतचा रस्ता ३५ वर्षांपूर्वी झालेला आहे. या रस्त्यावर तीन ठिकाणी रपटे पूल असून आज त्या रपट्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून डबकी साचत आहेत. पिंपळगाव सोनारा ते मेरा बु. हा रस्ता १५ वर्षांपूर्वी झालेला असून, या रस्त्यावरून चालणे सुद्धा कठीण झाले आहे. ९ किलोमीटर अंतरावरील रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ६० लाखांच्या कामाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. अद्याप टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने या रस्त्याचे भाग्य कधी उजाळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कामाला गती मिळावी यासाठी पिंपळगाव सोनारा येथील सरपंच तोताराम ठोसरे यांनी पालकमंत्री डॉ . राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मागणी केली आहे. त्यावर पालकमंत्र्यांनी ९ किलोमीटरचा रस्ता हा पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी प्रस्तावीत केल्याचे समजते.
साखरखेर्डा ते पिंपळगाव साेनारा -मेरा बु. या रस्त्याचे काम प्रस्तावित आहे़ लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात हाेणार आहे़
निखिल मेहेत्रे, कनिष्ठ अभियंता, सा. बां. विभाग
कित्येक वर्षांपासून या रस्त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे़
तोताराम ठोसरे, सरपंच, पिंपळगाव सोनारा