सुलतानपुर : अंत्री देशमुख ते सुलतानपूर या रस्त्याच्या दाेन्ही बाजूने नाली काढलेली नसल्याने रस्त्यावरील पावसाचे पाणी शेतात जात आहे़ त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे़ याविषयी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही़ त्यामुळे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे़
सुलतानपूर शेतशिवारात माळरानामधून अंत्रीदेशमुख ते सुलतानपूर हा डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे़ या रस्त्याच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरत आहे़ या रस्त्याच्या दाेन्ही बाजूने नाल्यांचे बांधकाम करणे आवश्यक हाेते़ मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियाेजनशून्य कारभारामुळे पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे़ संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत़ मात्र, दाेन ते तीन दिवसात नाली तयार करून देताे, अशी उत्तरे शेतकऱ्यांना मिळत आहेत. या पाण्यामुळे अनेकांच्या शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने पिके पिवळी पडू लागल्याचे चित्र आहे़
उताराखालील शेतीचे नुकसान
सुलतानपूर ते अंत्रीदेशमुख हा रस्ता माळरानातून गेलेला आहे़ या रस्त्याच्या बाजूला नाल्या नसल्याने पावसाचे पाणी उताराच्या दिशेने खाली येते. त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांचे पीक पाण्यातच राहतात. पाऊस जास्त झाल्यास या परिसरातील शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उपाययाेजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़
निवेदनाची दखलच नाही
सार्वजनिक बांधकाम मेहकर विभागाचे अभियंता यांना वारंवार याबाबत तोंडी सांगितले. तसेच अनेक वेळा लेखी अर्जसुद्धा दिले. तसेच १७ जून २०२१ला अर्ज देऊन प्रत्यक्ष भेटलो असता लवकरच काम सुरू करू असे सांगण्यात आले. मात्र अजूनही काम सुरू झालेले नाही. आता २६ ऑगस्टपर्यंत काम सुरू न झाल्यास शेतकरी बेमुदत उपाेषण करतील, असा इशारा परसराम सदाशिव सुरुशे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी दिला आहे़