या रस्त्याच्या कामासाठी बेमुदत उपोषण ही करण्यात आले होते. त्यामुळे २६ जानेवारीला या रस्त्याच्या कामास सुरूवात झाली होती. परंतू या ना त्या कारणाने कामास विलंब होत होता. अखेर या रस्त्याचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. हा रस्त्या अत्यंत महत्त्वपूर्ण असतानाही प्रशासनाने याकडे पाठ फिरवली होती. शिवाय रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेले होते. गावातील सांडपाण्यासाठी नाल्या नसल्यामुळे रस्त्याच्या मधोमध पाणी वाहत होते. त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळेच हा रस्ता अत्यंत महत्त्वपूर्ण होता. गावातील नागरिक वसुदेव थुट्टे, संदिप काळे, एकनाथ काळे, परमेश्वर साबळे, विजय वाहेकर यांनी स्वतः हा खर्च करून पाईपद्वारे पाणी रस्त्याच्या कडेला काढले. पण जोपर्यंत पक्की नाली रस्त्याच्या कडेला होत नाही, तोपर्यंत याचा काही फायदा नाही. या लोकांप्रमाणेच इतर नागरिकांनी स्वतः च्या सांडपाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
गावा लगत माझी शेती असून पुर्ण रस्ता शेताला समांतर आहे. या रस्त्यावरून नागरिकांनी काढलेले पाणी पुर्ण शेतात पाझरणार त्यामुळे चौदाव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून पक्क्या नालीचे बांधकाम करणे गरजेचे आहे.
वसुदेव थुट्टे, शेतकरी, रायपूर.
शोषखड्डे घेण्याचे आवाहन
ज्यापध्दतीने नागरिकांनी पाईपव्दारे रस्त्याच्या कडेला पाणी काढले, त्याच पध्दतीने इतर गावकऱ्यांनी सांडपाण्याची व्यवस्था करावी. शोषखड्डे घ्यावेत असे आवाहन करून निधी उपलब्ध झाल्यास त्वरीत नालीचे काम करण्यात येईल अशी माहिती ग्रामसेवक मवाळ यांनी दिली.